“निवडणूक विजयानंतर मोदी सरकारची जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:31 PM2022-03-22T16:31:31+5:302022-03-22T16:32:08+5:30

महागाईसारख्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा नेते गप्प का, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

nana patole criticised pm modi govt over fuel lpg gas price hike and inflation goes up | “निवडणूक विजयानंतर मोदी सरकारची जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट”: नाना पटोले

“निवडणूक विजयानंतर मोदी सरकारची जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईची भेट”: नाना पटोले

Next

मुंबई: पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात केंद्रातील मोदी सरकारने वाढ करून सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपाने महागाईच्या गर्तेत लोटले आहे.  निवडणुकीचे दिवस असताना इंधन दरवाढ रोखून ठेवली होती पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच भारतीय जनता पक्षाने जनतेला महागाईची भेट दिली अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
 
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात आल्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये ५० रुपये तर पेट्रोल व डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ केली. आधीच पेट्रोल, डिझेल प्रति लिटरचा दर शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे. तर गॅस सिलिंडर एक हजाराच्या जवळ पोहचला आहे. रशियाकडून कच्चे तेल सवलतीच्या किमतीत घेऊनही इंधन दरवाढ केली आहे. डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, उर्जा प्रकल्प, सिमेंट उत्पादन, मॉल्स यांच्यासाठीचे डिझेल २५ रुपये प्रती लिटरने महाग केले आहे. यामुळे महागाई वाढून त्याचा फटकाही शेवटी सामान्य माणसांनाच बसणार आहे. महागाईने मागील सात महिन्यातील उच्चांक गाठला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

सामान्य जनतेवर हा दुहेरी मार

एकीकडे लोकांचे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे महागाई मात्र वाढत असून सामान्य जनतेवर हा दुहेरी मार आहे. निवडणुकीच्या प्रचारात एलपीजी गॅस मोफत देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती. पण निवडणुका होताच मोफत गॅस तर सोडाच उलट आहे त्याच गॅसची किंमत वाढवली आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची हार होताच पट्रोल, डिझेलचे दर कमी केले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होताच महागाईची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे नेते महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यासारख्या ज्वलंत प्रश्नावर मूग मिळून गप्प बसतात आणि हिजाब, हिंदू- मुस्लीम, पाकिस्तान, जीना, या प्रश्नावर आकांडतांडव करून जनतेचे लक्ष मुख्य मुद्द्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, असे पटोले म्हणाले.
 

Web Title: nana patole criticised pm modi govt over fuel lpg gas price hike and inflation goes up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.