मुंबई: माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या संविधानाने दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून होत आलेले आहे. देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी दिलेले संविधान वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन नाना पटोले यांनी महामानवास अभिवादन केले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, जो. जो. थॉमस, प्रा. प्रकाश सोनावणे, माजी आमदार सुभाष चव्हाण, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, एनएसयुआयचे संदीप पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संविधानाला धाब्यावर बसवून मनमानी कारभार करतायत
जाती धर्मात विष पेरून काही पक्ष व संघटना सामाजिक वातावरण दुषित करण्याचे काम करत आहेत. देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो पण काही लोक संविधानाला धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य व संविधान धोक्यात असून ते वाचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथेही प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत काँग्रेस प्रदेशाध्यांनी हा दिवस देशभर एक उत्सव म्हणून साजरा करा असे आवाहन केले.