फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करा; नाना पटोले यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:37 AM2022-02-28T06:37:41+5:302022-02-28T06:38:28+5:30
देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय अधिकारी असे धाडस करत नाहीत. अवैध फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की, राज्यात भाजप सरकारच्या काळात माझ्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते.
अमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून आमचे फोन टॅप करण्यात आले. माझे नाव अमजद खान असे ठेवले होते, तर बच्चू कडू यांचे निजामुद्दीन बाबू शेख असे मुस्लीम नावे ठेवले होते. फोन टॅपिंगचा मुद्दा मी विधानसभेतही उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून जलदगतीने तपास करावा आणि या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड कोण हे शोधून त्याच्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.