Join us

Nana Patole : 'गावगुंड मोदीला पकडण्यात आलंय, त्यानच मला पाडण्याचा प्रयत्न केला होता'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 3:08 PM

नाना पटोलेंच्या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे

मुंबई - मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू केले. त्यावरुन, नानांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. तसेच, ते विधान गावगुंड मोदीबद्दलच होतं, असा पुनर्उच्चारही त्यांनी केला.   

नाना पटोलेंच्या स्पष्टीकरणानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. तसेच, त्यांना एक खुलं आव्हानदेखील दिलं आहे. नाना पटोलेंनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असे चॅलेंज भंडारी यांनी दिले आहे. त्यानंतर, नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना, भाजप एखाद्या मुद्द्याल धरुन राजकारण करत असल्याचे म्हटले. तसेच, देशातून नीरव मोदी, ललित मोदी देश लुटून पळून गेले त्याची भाजप नेते चौकशी करत नाहीत. 

हा गावगुंड कोण आहे याबाबत प्रश्न विचारला असता, पोलिसांचा तपास सुरू आहे. भंडारा पोलिसांनी मोदी नावाच्या गावगुंडाला पकडलं आहे. पोलीस चौकशी करत आहेत, असे नाना पटोलेंनी म्हटलं. काँग्रेसच्या जिल्हाप्रमुखांना भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सूचवले आहे. बिल्कुल त्यानं माझ्याविरोधात खूप प्रचार केला, मला पाडण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांमुळे मला हे कळालं, ज्या पद्धतीने भाजप पंतप्रधान पदाची गरिमा खालावत आहे, त्या भाजप नेत्यांविरुद्ध, कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सांगितलंय. दरम्यान, बाकी भंडारा पोलिसांना विचारा, असेही नानांनी सूचवले आहे. 

काय म्हणाले होते नाना पटोले

गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-कॉलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असे नाना पटोले म्हणताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :नाना पटोलेभाजपाकाँग्रेसनरेंद्र मोदी