मुंबई - पंडित जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित 'अशक्य ते शक्य' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित होते. मात्र, कोश्यारी यांच्या या विधानावरुन आता काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, राज्यपाल हे भाजपाचं काम करत असून राजभवन हे भाजपाचं कार्यालय बनल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यपाल 'भगतसिंह कोश्यारी यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा,' असंही नाना पटोले यांनी म्हटलं. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 'कोश्यारी यांनी नेहरुंच्या ‘शांतीदूत’ प्रतिमेवरून केलेले विधान हे चुकीचे व निषेधार्ह आहे. शांततेचा पुरस्कार करणे म्हणजे कमकुवतपणा नसतो, त्यासाठी मौठे धैर्य लागते. देशाची ७० वर्षांत झालेली प्रगती नेहरुंमुळेच. स्वातंत्र्यानंतर भारत देश आत्मनिर्भर म्हणून जगात ताठ मानेने उभा राहिला तो नेहरु यांच्या सक्षम, कणखर नेतृत्वामुळेच. परंतु, पंडित नेहरुंचा द्वेष करण्याचे संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दिले जातात, तो नेहरु द्वेषच राज्यपालांच्या बोलण्यातून व्यक्त झाल्याचे म्हणत नानांनी संताप व्यक्त केला.
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी
"अटलबिहारी वाजपेयींचा अपवाद वगळता आधीचं सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हतं. पंडीत जवाहरललाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण, त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असं त्यांना नेहमी वाटायचं. देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे. पण, त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होतं", असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.
वाजपेयींनी कणखर प्रतिमा जगाला दाखवून दिली
वाजपेयींच्या काळात देशात अणुचाचणी झाली. खंतर हे तंत्रज्ञान २० वर्षांपासून आपल्याकडे तयारच होतं. पण, त्याआधी सरकारनं अणुचाचणी करण्याची हिंमत दाखवली नाही. अणुचाचणीमुळे भारतावर जागतिक निर्बंध आले, पण वाजपेयी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि देशाने कणखर प्रतिमा जगाला दाखवून दिली, असंही कोश्यारी म्हटलं होतं. कारगिल विजय दिनानिमित्त सीमेवर लढलेल्या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सत्कार देखील करण्यात आला.
राजभवन बनलंय भाजपाचं कार्यालय
'राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत, ती सोडून कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो. तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. परंतु कोश्यारी यांनी राजभवनला भाजपचं कार्यालयच बनवलं आहे. ते नेहमी सरकारविरोधात आणि भाजपाधार्जिणे काम करत आले आहेत. कोश्यारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले आहेत, राज्यपाल पदावर असतानाही ते या संस्कारांतून बाहेर आलेले दिसत नाहीत. राज्यपालपद हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्या पदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवला पाहिजे, परंतु त्यांच्या वर्तनातून ते दिसत नाही. उलट त्यांचे वर्तन हे राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे आहे,' अशा परखड शब्दात नाना पटोलेंनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवली.