Join us  

Nana Patole: आता काँग्रेसचे नाना पटोलेही अयोध्येला जाणार, महंतांकडून खास निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 5:36 PM

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कुटुंबीयांसमवेत अयोध्या दौरा केला. या दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी, मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे गाड्यांचेही बुकींग केलं असून मोठा फौजफाटा घेऊन ते अयोध्येला जात आहेत. राज यांच्या दौऱ्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 10 जून रोजी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जात आहेत. त्यामुळे, राजकीय नेत्यांमध्ये अयोध्या दौरा आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी स्पर्धाच लागल्याचं दिसून येत आहे. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कुटुंबीयांसमवेत अयोध्या दौरा केला. या दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर, आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच, अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले.

अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यामुळे, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही अयोध्येचा दौरा करणार आहेत. मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गेल्याच आठवड्यात अयोध्या दौरा केला. त्यावेळी, कुटुंबांसमवेत त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेअयोध्या