Nana Patole: "दोन आठवड्यात 9.20 रुपयांनी महागलं पेट्रोल, पाकिटमार भाजप सरकार"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:08 AM2022-04-05T11:08:55+5:302022-04-05T11:10:48+5:30
पेट्रोल दरवाढीवरुन सोशल मीडियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधी पक्षातील नेतेही सातत्याने या दरवाढीचा निषेध नोंदवत आहेत
मुंबई - महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून इंधन दरवाढ काही केल्या थांबत नाही. विशेष म्हणजे गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढत आहेत. त्यामुळेच, आज पेट्रोलचे दर तब्बल 120 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसांनी ही दरवाढ होण्यास सुरुवात झाली. या दरवाढीतून गेल्या 15 दिवसांत पेट्रोलच्या दरात तब्बल 9.20 रुपयांची वाढ झाली आहे.
पेट्रोल दरवाढीवरुन सोशल मीडियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधी पक्षातील नेतेही सातत्याने या दरवाढीचा निषेध नोंदवत आहेत. महागाई आणि इंधन दरवाढीला थांबविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. त्यावरुन, भाजप खासदार सुब्रहमण्यम स्वामी (BJP Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर देत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही आज वाढलेल्या 80 पैशांच्या दरवाढीनंतर केंद्र सरकारवर टीका केली आहे. भाजपचं सरकार हे पाकिटमार सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, गेल्या दोन आठवड्यांत 9.20 रुपयांनी पेट्रोल महागलं असल्याचंही त्यांनी ट्विटरवरुन सांगितलंय.
मोदी सरकारकडून इंधन दरवाढीतून गोरगरीबांची लूट सुरुच! आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह दोन आठवड्यात इंधनात ९.२० रुपयांची दरवाढ ! पाकिटमार भाजपा सरकार!!
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 5, 2022
काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी
"इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. सुब्रहमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने देशात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. हे करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे देशविरोधीही आहे. या किमती वाढवून अर्थसंकल्पीय तूट भरून काढणे ही निव्वळ अक्षमता आहे"असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
निवडणुकीनंतर पेट्रोल महागलं
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली. नवीन दरवाढीनुसार पेट्रोल आणि डिझलेच्या किंमती राजधानी दिल्लीत १०४.६१ आणि ९५.८७ रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. तर, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११९.६७ आणि डिझेल १०३.९२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 आठवड्यात इंधनाची दरवाढ तब्बल 9 ते 10 रुपयांनी झाली आहे. त्यामुळे, महागाईला आटोक्यात आणण्यास सरकार सपशेल अपयशी ठरत आहे. निवडणूक काळात तब्बल 2 ते 3 महिने पेट्रोलच्या दरात काहीही बदल झाला नाही. दरवाढ कुठेही दिसली नाही. मात्र, निवडणुकांचे निकाल हाती येताच, 25 दिवसांत 10 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत.