मुंबई - मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विदयमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. यावेळी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही त्यांनी प्रहार केला.
विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी, प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. मुंबई सहकारी बँकेची लूट करण्यात आली. लेखापरिक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहे त्यानुसार सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते तेव्हा करेल तो भरेल, असे म्हणणारे भाजपाचे नेते आता दरेकर प्रकरणावरुन विनाकारण टीका करत आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली नाही, असेही पटोले यांनी म्हटले.
राज्यपाल हे 'भाजप'पाल
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, अशी टीकाही पटोले यांनी केली. आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे, एकदा का निवडणुक प्रक्रिया सुरु झाली की नावही जाहीर करू असेही पटोले म्हणाले.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर यांनी बोगस मजूर असल्याचं दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे(AAP Dhananjay Shinde) यांनी केली होती. याप्रकरणी शिंदे यांनीच पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा नोंद झाला आहे.