"अटल सेतू १०० टक्के सुरक्षित"; सरकारच्या स्पष्टीकरणावर नाना पटोले म्हणाले, "तडे गेल्याचे मान्य..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 01:40 PM2024-06-22T13:40:03+5:302024-06-22T13:50:20+5:30
अटल सेतूवरुन सुरु असलेल्या राजकारणावर सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय.
Atal Setu Bridge : मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी न्हावा शेव्हा अटल सेतू पुलावरून सध्या राज्यात राजकारण सुरू झालं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला. नाना पटोले यांनी अटल सेतूवर जात रस्त्याला तडे गेल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. अटल सेतू पुलाच्या मुख्य भागात कोणतेही तडे नसल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. याबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून अफवा पसरवल्या जात आहेत. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रकल्प प्रमुखांनी म्हटलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला.
भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूला उद्घाटनाच्या सहा महिन्यांतच तडे गेल्याची नाना पटोले यांनी म्हटलं. अटल सेतूच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप नाना पटोलेंनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सरकारने मात्र अटल सेतूच्या रस्त्याला जोडणारा रस्त्याला तडा गेल्याचे म्हटलं आहे. सरकारच्या या स्पष्टीकरणावरुन आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तडे गेल्याचे सरकारने मान्य केले असून आपलं पाप लपवण्यासाठी ते खोटं बोलत असल्याचे नाना पटोले म्हणाले.
"मुंबई आता हवा तसा पाऊस झालेला नाही. नाहीतर सगळा रस्ता वाहून गेला असता. पाऊस पडलेला नसतानाही रस्त्याला दोन फुटांपर्यंत तडे गेले आहेत. समृद्धी महामार्ग पाहा. सगळीकडे भ्रष्टाचार झालाय. लोकांचा मृत्यू झाल्याने यांना काही फरक पडत नाही. सरकार लपवण्यासाठी स्पष्टीकरण देत आहे. पण तडे गेल्याचे सरकारने मान्य केले आहे. तीन महिन्यापूर्वी रस्ता झाला. मग रस्त्याला तडे कसे गेले? हा अटल सेतूला जोडणारा रस्ता आहे ना. तिथूनच मुख्य रस्त्यावर जातात. रस्ताच वाहून गेले तर लोक समुद्रात जातील. सरकार आपलं पाप लपवण्यासाठी खोटं बोलत आहे. जनतेच्या पैशाचा सरकारने दुरुपयोग केला आहे. याचा परिणाम जनतेला भोगायला लागू नये म्हणून आम्ही सरकारला सतर्क केले आहे," असे नाना पटोले यांनी म्हटलं.
एमएमआरडीएचे स्पष्टीकरण
नाना पटोले यांच्या दाव्यानंतर एमएमआरडीएचे प्रकल्प प्रमुख कैलाश गंत्रा यांनी याबाबत भाष्य केले. "अटल सेतू १०० टक्के सुरक्षित आहे. जर तुम्ही अप्रोच रोडबद्दल बोलत असताल, तर तुम्हाला दिसेल की सुरक्षेसाठी रस्त्यांवर बॅरिकेड्स लावलेले आहेत. साईनबोर्ड आहेत. ब्रिज सुरू होण्यापूर्वी सेफ्टी ऑडिट झाले होते आम्ही सेफ्टी ऑडिटने केलेल्या सर्व शिफारसींचे पालन केले आहे," असे कैलाश गंत्रा म्हणाले.
#WATCH | On Atal Setu bridge, Maharashtra Congress President Nana Patole says, " I want to ask the govt a question...this year, Mumbai hasn't received the kind of rain it usually receives otherwise the whole way would have been washed away. On the way, if there is a crack in… pic.twitter.com/VfGPoeFc2p
— ANI (@ANI) June 22, 2024
अटल सेतूला कोणताही धोका नाही - देवेंद्र फडणवीस
“अटल सेतूला कोणताही तडा गेलेला नाही. अटल सेतूला कोणताही धोका नाही. हे चित्र जवळच्या रस्त्याचे आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेस पक्षाने खोट्याचा आधार घेऊन एक लांबलचक योजना आखली आहे. निवडणुकीच्या वेळी संविधान बदलण्याच्या चर्चा, निवडणुकीनंतर फोनवरून ईव्हीएम अनलॉक करण्याचा आरोप आणि आता अशा खोट्या अफवा. मात्र, देशातील जनताच या ‘दरार’ योजनेला आणि काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पराभव करेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.