लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिर्डी येथे जूनच्या सुरुवातीला झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प कार्यशाळेतील घोषणापत्राची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यासाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.
९ ते १५ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात पदयात्रा, २ ऑक्टोबरपासून भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विकासविरोधी व द्वेषमूलक भूमिकेविरुद्ध रान उठविले जाईल. देशाचे अर्थकारण मोदी सरकारने कसे संकटात आणले आहे, याविषयी जनजागृती केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
राज्यात समविचारी पक्षाबरोबर आघाडी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यासाठी एक जिल्हास्तरावर समीक्षा समिती स्थापन केली जाईल व त्या समितीच्या निर्णयाचा विचार करून राज्य पातळीवर आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे. - अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते