अमिताभ, अक्षय कुमार यांना महाराष्ट्रात शूटिंग करू देणार नाही; नाना पटोले यांचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:55 PM2021-02-18T13:55:33+5:302021-02-18T13:56:06+5:30
Nana Patole on Amitabh Bachchan and Akshay Kumar: अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्विट्सचा संदर्भ देत नाना पटोले यांनी दोन्ही कलाकारांवर सडकून टीका केली.
काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन टिवटिव करणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अक्षय कुमार(Akshay Kumar) आता गप्प का? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अमिताभ, अक्षय यांना महाराष्ट्रात शुटिंग करू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. (Nana Patole on Amitabh Bachchan and Akshay Kumar)
अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केलेल्या जुन्या ट्विट्सचा संदर्भ देत नाना पटोले यांनी दोन्ही कलाकारांवर सडकून टीका केली. "काँग्रेस सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन सारखी टिवटिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना आता पेट्रोलची दरवाढ दिसत नाही का? त्यावेळी ६० रुपये पेट्रोलची किंमत असताना हे सेलिब्रिटी शंख करत होते. मग आता पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. अशावेळी हे सेलिब्रिटी शांत का? केंद्रात मोदींचं सरकार आहे म्हणून हे चिडीचूप झालेत का?" अशा प्रश्नांची सरबत्ती करत नाना पटोले यांनी अमिताभ आणि अक्षय यांच्यावर टीका केली. यासोबतच महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे परवड होत असताना अमिताभ व अक्षय यांची चुप्पी योग्य नाही. त्यांना महाराष्ट्रात शूटिंग करण्याचा अधिकार नाही. त्यांचं जिथं कुठं शूटिंग सुरू असेल तर बंद पाडण्याची व्यवस्था आम्ही करू, असा थेट इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांच्या बेधडक इशाऱ्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पटोलेंचं विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. "नाना पटोले हे आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षानं अशा पद्धतीचं विधान करणं हास्यास्पद आहे. ते आधी २००९ साली काँग्रेस सरकार कसं शेतकरी विरोधी सरकार आहे अशी बोंब ठोकत होते. नाना पटोले ते सारंकाही विसरलेत का?", असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.