Nana Patole: तेव्हा नाना पटोलेंचं नाव ठेवलं अमजद खान, बच्चू कडूंनाही दिलतं भलतंच नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:21 PM2022-03-14T18:21:21+5:302022-03-14T18:22:26+5:30
सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे फोन टॅपिंगप्रकरण घडले होते. त्यामध्ये, नेत्यांनी नावे बदलून टोपण नाव ठेवण्यात आले होते.
मुंबई - पुणे पोलीस आयुक्त असताना बेकायदा फोन टॅप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च २०१६ मध्ये त्यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. या काळात त्यांनी गुन्हेगारांच्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली. त्याचवेळी त्यांनी काही राजकीय व्यक्तींचेही फोन बेकायदा टॅप केले. यासंदर्भात विधानसभेत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली.
सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे फोन टॅपिंगप्रकरण घडले होते. त्यामध्ये, नेत्यांनी नावे बदलून टोपण नाव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं नाव अमजद खान, बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख आणि संजय काकडे यांचं नाव तरबेज सुतार असे ठेवण्यात आले होते, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली.
संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती
महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२१ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नांनुसार शासनाने २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीतील संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरणी पडताळणी करण्याकरिता राज्य सरकारने तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल शासनाने स्वीकृत केला. या उच्चस्तरीय समितीने तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केले, असे नमूद केल्याने रश्मी शुक्ला आणि इतर संबंधितांवर भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानहानीचा दावा ठोकणार - नाना पटोले
अमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंध लावून तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी माझे फोन टॅप केले. याविरोधात रश्मी शुक्ला यांच्यासह संबंधितांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी जाहीर केले. तसेच, धारावी पुनर्विकास प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचेही पटोले यांनी सांगितले.