मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता असताना शिवसेनेतच एकनाथ शिंदे यांनी मोठा भूकंप घडवून आणला आहे. रातोरात शिवसेनेच्या निम्म्या आमदारांना घेऊन ते सूरतला गेले आहेत. दुसरीकडे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते विजयाचा जल्लोष करण्यात व्यस्त असताना शिंदेंनी मविआच्या बुडाखाली सुरुंग पेरल्याने त्याचा हादरा गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसला आहे. शिंदेंच्या बंडानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच, पराभवासंदर्भात भाष्य करतान महाविकास आघाडीला अडचण नसल्याचेही ते म्हणाले.
''भाजपचा देशातील राजकारणाचा हा अध्याय आहे. भाजप केंद्राच्या सत्तेचा दुरुपयोग करत आहे, हे आता लपून राहिलं नाही. सत्तेपासून सत्ता आणि सत्तेपासून पुन्हा पैसा हे चक्र भाजपने फिरवला आहे. असत्याच्या मार्गावर भाजप आहे, हे थोडावेळ आहे. ऊन-सावलीचा हा खेळ आहे, महाराष्ट्रावर आलेलं हे ऊन सावलीत रुपांतरीत होईल,'' असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
शिवसेना आमदारांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, ही रात्रीची घटना आहे. त्यामुळे, मी मुंबईत कांग्रेस नेत्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करेल. बहुमताचा आकडा पारित करायला दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांना आकडा गाठणं दूर आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीला कुठलिही अडचण नाही. आमच्या पक्षातील बंडखोरांवर कारवाई केली जाईल, असेही पटोले यांनी म्हटले. दरम्यान, आज दिल्ली वगैरे काही नाही. मी सर्वच आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यासाठी मी मुंबईला जात आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस हेही गायब
एकनाथ शिंदे गायब झालेले असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गायब झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाशिकमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाला फडणवीस जाणार होते. परंतू ते तिथे पोहोचलेच नाहीत. त्र्यंबकेश्वर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी फडणवीस रात्रीच येणार होते. मात्र, ते आलेच नाहीत.