Join us

लसीकरण केंद्राबाहेर थाळी वाजवून केंद्राचा निषेध करणार - नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नसतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केंद्र सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नसतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, लसीअभावी राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद असताना ‘महोत्सव’ कसा होऊ शकतो, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात लसीकरण केंद्राबाहेर काँग्रेस घंटानाद, थाळीनाद आंदोलन करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र केंद्र सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नसल्याने अनेक जिल्ह्यातील लसीकरण बंद आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन होत असताना महाराष्ट्राला पुरेशी लस पुरवण्याऐवजी जगभरातील अनेक देशांना मोफत लस पुरवठा केला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

महाराष्ट्रापेक्षा कमी रुग्णसंख्या आणि लोकसंख्या असलेल्या गुजरातसारख्या भाजपशासीत राज्यांना मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. केंद्र सरकार जाणीवपूर्वक विरोधी पक्षांच्या सरकारची कोंडी करून अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडण्याचे राजकारण करत आहे. महोत्सवासारखे इव्हेंट करण्यातच मोदी सरकार वेळ घालवत आहे. म्हणूनच लसींचा पुरेसा पुरवठा होऊन लसीकरण सुरळीत होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.