काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना झाल्याची समोर आली आहे. सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले. आता या अपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी अपघाताबाबत वेगळा संशय व्यक्त केला आहे.
मोठी बातमी: पवारांच्या उपस्थितीत मोहिते पाटलांची घरवापसी होणार; उमेदवारी अर्जाचाही मुहूर्त ठरला!
"ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी हा विषय सिरीअस घेतला पाहिजे. राजकारण म्हटलं की थोडीफार खुन्नस येतेच, असं नाही म्हणता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी तपास केला पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्या ड्रायव्हरची माहिती घेतली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांनी नेत्यांना अधिक संरक्षण दिलं पाहिजे, नाना पटोलेंच आरोग्य चांगल रहाव अशी इच्छा व्यक्त करतो. ऐन निवडणुकीच्या काळात अपघात झाला त्यामुळे इथे संशय घ्यायला जागा आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेस नेत्यांचा आरोप
नाना पटोलेंच्या ताफ्यातील कारला झालेल्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे, असा आरोप लोंढे यांनी केला. दरम्यान, या अपघातात मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत,अशी माहितीही अतुल लोंढे यांनी दिली आहे.
प्रचार सभेनंतर अपघात
भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील प्रचार सभा आटोल्यानंतर नाना पटोले हे आपल्या वाहनाने (एमएच ३१, एक्स झेड ७९७) खाजगी ताफ्यासह साकोली तालुक्यातील सुकळी या स्वगावी जाण्यास निघाले होते. दरम्यान, भंडारापासून ७ किलोमीटर अंतरावरील भीलेवाडा या गावाजवळ मागेहून येणाऱ्या ट्रकची (सीजी ०४, एन टी ८७३९) त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. यात चालकाच्या मागच्या बाजुकडील भाग नुकसानग्रस्त झाला. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.