नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. देशात वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्यांना वापस घेण्यात येणार असल्याचे मोदींनी देशवासीयांना सांगितले. तसेच, आंदोलक शेतकऱ्यांनी घरी जावे, गुरु नानक जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत असावे, असेही मोदींनी म्हटले. मोदींच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, विरोधकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत करत, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे म्हटले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही मोदींना टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावरुन संसदेत बोलताना, शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' म्हणून हिणवले होते. मात्र, आज त्याच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे. आपला एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारने 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यावरुन, अनेकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राने यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता, असे विरोधकांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मोदींच्या या आंदोलनजीवी टीकेवरुनच त्यांना टोला लगावला.
शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं. आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली. हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
बळीराजाने गर्विष्ठांच्या माना झुकवल्या
दिल्लीच्या सीमारेषेवर केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. त्यानंतर, देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही मोदींच्या या निर्णयावर मत व्यक्त केलंय. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिलीय. देशातील अन्नदाता शेतकऱ्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या. अन्यायविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा... असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, राहुल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मला अभिमान वाटतो, मी या आंदोलनास पूर्णपणे समर्थन देत आहे. मी शेतकऱ्यांसोबत असून पंजाबमध्ये जाऊन हा मुद्दा उपस्थित करणार आहे. तर, सरकारला हे तीन कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू, असे राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते.