बारामतीत नणंद विरुद्ध भावजय फिक्स; अखेर सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 07:56 PM2024-03-30T19:56:32+5:302024-03-30T19:57:15+5:30
बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची अगोदरच घोषणा झाली होती
मुंबई - राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाच्या उन्हाळ्यात राजकीय वातावरणही तापणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच उत्सुकता लागली असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आजच घोषणा झाली. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय, लढत फिक्स झाली आहे.
बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंच्या नावाची अगोदरच घोषणा झाली होती. त्यामुळे, आपल्या लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी प्रचारालाही सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांनीही त्याच अनुषंगाने विविध नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. तर, पवार कुटुंबीयही या निवडणुकीत मैदानात उतरले आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. अखेर, या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून बारामतीमधून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. सुप्रिया सुळे चौथ्यांदा बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. तर, सुनेत्रा पवार पहिल्यांदाच निवडणुकांच्या मैदानात उतरल्या आहेत. आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले.
#WATCH | On her candidature from Baramati, NCP candidate Sunetra Pawar says "Today is a huge day for me. I want to thank Prime Minister Narendra Modi, Union HM Amit Shah, Maharashtra CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis and Ajit Pawar for showing faith one me..." pic.twitter.com/xrXlpc2OCi
— ANI (@ANI) March 30, 2024
माझ्यासाठी आज सर्वात मोठा दिवस आहे. माझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऱाष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित दादा यांनी विश्वास दाखवला. महायुतीमधील सर्वच नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि काम करण्यासाठी दिलेल्या संधीबद्दल मी सर्वांचे आभार मानते, असे सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हटले.