नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे आक्रमक, पेट्रोलियममंत्र्यांना भेट नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 03:30 PM2018-06-27T15:30:55+5:302018-06-27T16:08:28+5:30
नाणार प्रकल्पासवरुन शिवसेना-भाजपामध्ये तणाव वाढल्याचे दिसत आहेत.
मुंबई - नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामध्ये तणाव वाढल्याचे दिसत आहेत. कारण, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार देत प्रस्ताव फेटाळून लावला आहे. नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी उद्या उद्धव ठाकरेंकडे भेटीची वेळ मागितली होती. करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशासाठी?, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भेटीचा प्रस्ताव फेटाळला आहे.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळाची बैठकतही नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटले. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत निषेध नोंदवला. नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतले नसल्याची तक्रारही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली.
तर दुसरीकडे, नाणार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. नाणारबाबत सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींचा सामंजस्य करार सोमवारी झाला. दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. माध्यमांतूनच मला माहिती मिळाली. याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. केंद्र सरकारमध्ये अनंत गीते हे आमचे मंत्री आहेत. त्यांनाही याची कोणतीही कल्पना दिली गेली नाही, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.
(नाणार प्रकल्पासाठी ३ लाख कोटींचा करार)
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या.
रत्नागिरी जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’च्या (आरआरपीसीएल) वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच.नसीर आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) चे राज्यमंत्री तथा एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी केंद्रीय पेट्रोलियम
मंत्री धमेंद्र प्रधान आणि यूएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षºया केल्या.
इंडियन आॅईल कॉपोर्रेशन लिमिटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेड (बीपीसीएल)आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागिदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या
निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे.
या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यात येईल. तसेच, पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनेही या प्रकल्पातून करण्यात येणार आहेत. या सोबतच मोठ-मोठ्या प्रकल्पांसाठी कच्चा मालही या प्रकल्पातून पुरविण्यात येणार आहे.
यापूर्वी ११ एप्रिल २०१८ रोजी १६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रीस्तरीय शिखर संमेलनात सौदी अरामकोने भारतासोबत आरआरपीसीएल प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला असून आज एडनॉक समूहाला सहगुंतवणूकदार केले आहे.