अमिताभ यांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल रुग्णालयाचं स्पष्टीकरण, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 08:28 PM2020-07-12T20:28:15+5:302020-07-12T20:31:49+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
मुंबई - महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालय हद्दीतील जुहू भागात निवासस्थान असलेले, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरुन काल रात्री स्वतः जाहीर केली. त्यानंतर, ते राहात असलेल्या भागातील त्यांचे चारही बंगले आज महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित केले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्या चाहत्यांनी आपुलकी व्यक्त केली. तसेच, गेट वेल सुन असे मेसेजही व्हायरल झाले. त्यानंतर, आज सकाळी अमिताभ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता, या व्हिडिओबाबत नानावटी रुग्णालयाने सत्य माहिती दिली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चन याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि आता ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जया बच्चन यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटीव्ह आला आहे. मुंबई महानगरपालिकेने तसे जाहीर केले आहे.
अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांची कोरोना चाचणी झाली होती. अमिताभ यांना कोरोना लागण झाल्याचे कळताच, देशभरातील चाहत्यांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली. त्यानंतर, सोशल मीडियावरुन अमिताभ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या, व्हिडिओमध्ये अमिताभ यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफ कशारितीने रुग्णांची काळजी घेतो, हे त्यांनी सांगितलंय. मात्र, हा व्हिडिओ आजचा नसल्याचे रग्णालय प्रशासनाने पत्राद्वारे सांगितले आहे.
नानावटी रुग्णालयाकडून स्पष्टीकरण pic.twitter.com/mxnsBLmLQr
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2020
अमिताभ यांचा तो व्हिडिओ एप्रिल महिन्यातील असून डॉक्टर, नर्सेस आणि कोरोनाच्या लढाईत लढणाऱ्या सर्वांच्या हिताचा योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बनविण्यात आला होता. एप्रिल महिन्यात अमिताभ यांनी नानावटी रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटरसाठी काही मदत दिली होती. त्यावेळी, कोविड सेंटरमधील स्टाफसाठी त्यांनी हा प्रेरणादायी संदेश दिला होता.