बोरीवलीतील 'नॅन्सी कॉलनी' असुविधांचे आगार
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 3, 2025 12:35 IST2025-03-03T12:34:28+5:302025-03-03T12:35:19+5:30
सुरक्षारक्षकांनाच अशी मारहाण होत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय ? असा सवाल आता विचारला जात आहे.

बोरीवलीतील 'नॅन्सी कॉलनी' असुविधांचे आगार
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील नॅन्सी कॉलनी एसटी आगारातील सुरक्षादेखील रामभरोसेच असल्याचे चित्र आहे. या आगारात तीन पाळ्यात फक्त तीन सुरक्षारक्षक तैनात आहेत. विशेष म्हणजे आगारात प्रवेश बंद करण्यासाठी दरवाजाच नसल्याने रात्री दारुड्यांची सर्रास ये-जा सुरू असते. सुरक्षारक्षकांनी त्यांना जाब विचारल्यास काहीवेळा त्यांना मारहाण झाल्याचे प्रकारही घडले आहेत. सुरक्षारक्षकांनाच अशी मारहाण होत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय ? असा सवाल आता विचारला जात आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून जवळ चार ते पाच एकर जागेत नॅन्सी कॉलनी आगार आहे. १९८१-१९८२ च्या सुमारास बांधण्यात आलेल्या या आगारात एका छोट्याशा वास्तूत वाहतूक नियंत्रकाची चौकी आणि प्रवाशांना बसण्यासाठी जेमतेम जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रसाधनगृहातही अक्षरशः अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. येथे ऐसपैस नवीन बस फलाट, सुसज्ज वाहतूक चौकी आणि प्रवासी आसन व्यवस्था बांधण्यात आली; मात्र ही वास्तू अडीच वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने सर्वांचीच मोठी गैरसोय झाली आहे. नवीन बस फलाटच्या मागील बाजूला बस चालक आणि वाहकांच्या विश्रांतीगृहाचे काम प्रगतिपथावर आहे.
निवृत्त सैनिकाची सायंकाळी चार तास सेवा
सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना येथे निवृत्त सैनिक जी. व्ही. आचरेकर दररोज सायंकाळी चार तास सेवा बजावतात. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग असलेल्या आचरेकर यांची शिस्त प्रवाशांनाही जबाबदारीने वागण्यास प्रवृत्त करते. त्यांची करडी नजर या परिसरात असते. १९ फेब्रुवारीला एक संशयित महिला येथील सीसीटीव्हीत कैद झाली. लगेच पोलिसांना बोलावून त्या महिलेला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.