मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) पदोन्नतीसाठी १५ जणांची यादी तयार आहे; मात्र सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र असणाऱ्या चौदा अधिकाऱ्यांना डावलून नंदकिशोर पाटील यांना पदोन्नती दिली, असे सांगत आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पदोन्नती आदेशात म्हटले आहे, विभागीय समितीने शिफारस केल्यानुसार मोटार वाहन विभागातील सहायक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांना बारामती येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे, तसेच या अधिकाऱ्याला सेवाज्येष्ठता आणि आर्थिक लाभ मागण्याचा अधिकार असणार नाही, असे म्हटले आहे; पण कोणी न्यायालयात गेल्यास अडचण नको, असा उल्लेख अनेक वेळा पदोन्नतीच्या आदेशात केला जातो.
एकाच पदोन्नतीचे आदेश कसे
राज्यात पदोन्नतीसाठी १५ जणांची यादी तयार असताना एकमेव पदोन्नतीचा आदेश काढण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या तोंडावर एका दिवसासाठी पदोन्नती मिळत आहे, असे असताना एकाच अधिकाऱ्याच्या बदलीचे आदेश काढण्यात आले होते. इतकी वर्षे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हा अन्याय नाही का, असा सवाल एका अधिकाऱ्याने विचारला आहे.