Join us

आनंदाचा नंदू स्वामीमय जाहला

By admin | Published: September 25, 2016 1:37 AM

आमच्या मैत्रीचे सूर जुळले ते १९७७ पासून. मी दूरदर्शनवर असताना अनेक संगीत कार्यक्रमात नंदू होनप आणि विलास जोगळेकर यांना वादक म्हणून आम्ही नेहमीच बोलवायचो

- जयंत ओकआमच्या मैत्रीचे सूर जुळले ते १९७७ पासून. मी दूरदर्शनवर असताना अनेक संगीत कार्यक्रमात नंदू होनप आणि विलास जोगळेकर यांना वादक म्हणून आम्ही नेहमीच बोलवायचो. अडीअडचणीला ते तर तत्परतेने धावून यायचे. एकदा रात्री ११ वाजता त्यांना फोन केला. अचानक एका गायकाचे रेकॉर्डिंग उद्या सकाळी १0 वाजता ठरले आहे. पेटी, तबला, व्हायोलिन, तालवाद्य या सर्वांना तू उद्या घेऊन येच. पलीकडून आवाज आला, ‘जयंतराव काळजी नका करू. कुठल्याही परिस्थितीत मी सर्वांनाघेऊन उद्या हजर आहे.’ सकाळी ठीक १0 वाजता सर्व जण हजर! योग म्हणजे रेकॉर्डिंगही वन टेक ओके झाले. त्यानंतर, आमचे सूर जुळले ते कायमचे! त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मला निवेदक म्हणून बोलवायचे. मीही त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन मुलाखतीचे कार्यक्रम करू लागलो. त्यांची मुलाखत आणि सोबतीला व्हायोलिन वादन! शेकडो कार्यक्रम आम्ही केले. ते स्वत: निर्व्यसनी आणि अखंड नामस्मरण व प्रवासात स्वामींचे अनेक अनुभव मला सांगत.त्या संस्काराचा परिणाम नकळत आम्हा कलाकारांवर झाला. अंगात भगवी कफनी, भगवी लुंगी, गळ्यात स्वामींच्या स्फटिक/रुद्राक्षांच्या माळा आणि कपाळावर भले मोठ गंध हा त्यांचा वेष! रेल्वेने किंवा विमानाने जाताना हा कोण अवलीया म्हणून लोक त्यांच्याकडे विस्मयतेने पाहात, पण हा अवलिया एकदा रंगमंचावर बसला की, त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागायची.त्यांच्या ‘निघालो घेऊनी दत्ताची पालखी’ने तर महाराष्ट्राला वेडच लावले. नंदू होनप, प्रवीण दवणे आणि गायक अजित कडकडे या त्रिमूर्तीने तर कहरच केला. शंकरावर कॅसेट, सीडी या फक्त स्वामी समर्थांच्यावर प्रकाशित झाल्या आहेत. हे सांगताच टाळ्याचा कडकडाटात नंदूचे स्वागत व्हायचे. आणखी एक विलास जोगळेकर आणि नंदूजी होनप ही जोडगोळी नंदूजींचे एकही रेकॉर्डिंग विलास जोगळेकरांशिवाय पूर्ण झाले नाही. जिवा शिवाचीच जोडी होती ती. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ ही चाल नंदूजींनी केली. अ‍ॅरेंजर (संगीत संयोजक) अर्थातच विलास जोगळेकर. रात्रभर दोन कडव्यांमधील संगीत सूचत नव्हते. विलास म्हणाले, ‘या गाण्याला मधले संगीत नाहीच. फक्त प्रत्येक कडव्यानंतर ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ आणि हेच योग्य आहे.’ पुढे काय क्रांती झाली, हे काय वेगळे सांगायला नकोच. त्यांच्या अनेक कार्यक्रमाचे मी निवेदन करायचो, त्यांना एकदा विचारले, ‘तुम्हाला चाली कशा सुचतात?’ तर ते म्हणाले, ‘संगीत हा ईश्वराचा आत्मा आहे आणि सूरही आहे. त्यातही भारतीय संगीत ईश्वराचा श्वास आहे. सदैव दु:ख, विवंचना, अपमान, उपेक्षा यांनी भरलेल्या या जगात जीवन सुसह्य होते ते संगीताने! अरे माझ्या सगळ्या चाली पारंपरिक आहेत. पेटीवर बसल्यावर त्या सुरांत स्वामी एकरूप करतात. यात माझे काहीच नाही,’ असे ते म्हणायचे.त्यांची एक आठवण सांगण्यासारखीच आहे. चार वर्षांपूर्वी गिरगावतल्या कांदेवाडीतील स्वामींच्या मठात होनप यांची श्रावण सोमवारी सेवा होती. शेवटी व्हायोलिनवर समर्थ नामाचा जयघोष सुरू झाला. मी निवेदनाला होतो. समोर आठ फुटी स्वामींचा फोटो. त्यावर रोज भाळी सोन्याचा मुकुट लावलेला. गजर टिपेला जात होता. त्याच वेळी स्वामींचा तो सोन्याचा मुकुट हळूहळू खाली सरकत आला आणि गजर संपताच तो मुकुट स्वामींच्या पादुकांवर विराजमान झाला. नंदू होनपांना तो आशीर्वादच लाभला होता. उपस्थित सर्वच याचे साक्षीदार होते, असे अगणित अनुभव सांगता येतील. दोन वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये आय.सी.यूमध्ये होते. कोमात होते. शुद्धीवर आले की म्हणायचे, ‘मी जगणार आहे. स्वामींचे कार्य पूर्ण करायचे आहे.’ त्या वेळी सुश्रुयालयात अजित कडकडे, वैशाली सामंत, सुरेश भोसले, स्वप्निल बांदोडकर, पत्नी सुगम आणि त्यांचा मुलगा स्वरूप सर्व सतत जागता पाहरा ठेवत. एक दिवस चमत्कार घडला. रात्रौ स्वप्नात स्वामींनी सद्गुरुंनी दृष्टांत दिला, ‘तू अठ्ठेचाळीस तासांत खडखडीत बरा होऊन घरी जाशील. आणि चक्क ते बरे झाले. सुखरूप घरी आले. महिनाभराने पुन्हा काम सुरू! शनिवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा कार्यक्रम रवींद्र नाट्यमंदिरात होता. कार्यक्रमाच्या शेवटी आणि शहनाई वादक शैलेश भागवत आणि व्हायोलिनवर नंदू होनप होते. शेवटी ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ आणि नंतर स्वामींचा गजर आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा नामघोष व्हायोलिनवर, शहनाईवर सुरू झाला. नंदूजी एकरूप झाले होते. लय वाढत होती. स्वर आसमंतात घुमत होते. जयघोष अगदी टीपेला गेला. शेवट होणार इतक्यात, नंदू व्हायोलिनसह रंगमंचावर खाली कोसळले. काही क्षणातच त्यांची प्राणज्योत स्वामी समर्थांच्या हृदयात विराजमान झाली.स्मृतिदिन म्हणजे काय- तर जुन्या आठवणींचे जागरण।वेळोवेळी केलेल्या चांगल्या कामाची स्तुती! देवाची नाही का आपण आरती करतो, भजन करतो, प्रार्थना करतो. तो कुठे तिथे ऐकायला असतो? पण तो देव तिथे असतो, खात्रीने असतो, आपले गाऱ्हाणे ऐकतोय ही आपली श्रद्धा असते, निष्ठा असते. आज आपल्यात कुठे आहेत स्वामीभक्त संगीतकार नंदू होनप? पण त्यांच्या संगीताने, त्यांच्या स्वामी भक्तीने, त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांनी ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहेतच. मन आणि शरीर, हÞदय आणि शरीर हे काय दोन वेगळे भाग आहेत? एक बिंब आहे तर दुसरे प्रतिबिंब! एक सागर आहे, तर दुसरे लहर म्हणून तर एक आंदोलित झाले की, त्याचे तरंग दुसऱ्यावर उमटतात. तेच तर त्याचे व्यक्तिमत्त्व असते, असे नंदूजी नेहमी म्हणत असत.

(लेखक गप्पागोष्टीकार आहेत.)