मुंबई : सूक्ष्म विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी, तसेच सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविण्यासाठी मुंबई विद्यापीठात नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील उपकरणे धूळखात पडली आहेत.मुंबई विद्यापीठाला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कलिना संकुलात नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीची हे सेंटर उभारण्यासाठी अनुदान मंजूर केले होते. सूक्ष्म विज्ञान क्षेत्रात होणारे बदल ओळखून त्याचा अभ्यास करण्यासाठी, तसेच औद्योगिक विकासासाठी लागणारे तंत्रज्ञान तयार करण्यावर भर देण्यासाठी, या केंद्रात मोठी आणि भौतिक उपकरणे आणून ठेण्यात आली आहेत. मात्र, १.२५ स्क्वेअर फूट जागेवर पसरलेल्या या सेंटरची योग्य काळजी घेतली जात नसल्याने, येथील काही उपकरणे धूळखात असून, अनेक उपकरणे बंद पडली आहेत. काहींचा दर्जा खालावत चालला आहे. काही उपकरणांचा तर हमी कार्यकाळही संपला आहे.सिनेट सदस्य सुप्रिया कारंडे आणि युवासेना सदस्य साईनाथ दुर्गे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील या सेंटरला नुकतीच भेट दिली. त्या वेळी या उपकरणांची झालेली दुरवस्था उघडकीस आली, शिवाय एवढ्या मोठ्या जागेची सफाई करण्यासाठी येथे केवळ दोनच कर्मचारी आहेत. या उपकरणांच्या देखभालीसाठी गरजेचे असलेले एसीही बंद पडले आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, या सेंटरमध्ये १७ पूर्ण वेळ सायंटिफिक टेक्निकल असिस्टंटच्या जागारिकाम्या असून, टेक्निकलस्टाफचीही नेमणूक करण्यात आली नसल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. त्यामुळे १६० विद्यार्थ्यांची क्षमता असूनदेखील केवळ पुरेशा उपकरणांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळेच केवळ एमएससी रिसर्चचे ४० विद्यार्थीच या सेंटरमध्ये शिकत असल्याचे सिनेट सदस्यांनी सांगितले.>बैठकीअंती उपाययोजनाकुलगुरूंपर्यंत हा विषय आला असून, लवकरच त्यावर संबंधित विभाग आणि सिनेट सदस्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सेंटरमधील सगळ्या समस्यांवर चर्चा करून उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.
संशोधनासाठी उभारलेल्या नॅनो टेक्नॉलॉजीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:39 AM