Join us

वेसावे गावचा नारळ सोन्याचा निंगालाय नारळी पुनवेचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 9:06 PM

अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात  नारळी पोर्णिमा अगदी पारंपारीक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारी देखील जोरदार असते

- मनोहर कुंभेजकर   मुंबई - अंधेरी तालुक्यातील वेसावे कोळीवाड्यात  नारळी पोर्णिमा अगदी पारंपारीक पद्धतीने थाटात साजरी केली जाते. या सणाच्या आगमनाची तयारी देखील जोरदार असते,कारण वेसाव्यातील प्रत्येक कोळी बांधव या सोन्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.मासेमारीच्या होड्यांची रंग रंगोटी, झेंडे-पताक्यांनी बहारदार सजावट व महिलांनी तयार केलेल्या चवदार नारळाच्या करंज्या हे कोळीवाड्यातील मुख्य आकर्षण असते. येत्या शनिवारी साजऱ्या होणाऱ्या नारळी पौर्णिमेसाठी वेसावे,वरळी,धारावी,माहुल,माहीम,खारदांडा,जुहू,मढ,भाटी,मालवणी,मनोरी व गोराई हे मुंबईतील विविध कोळीवाडे सज्ज झाले आहेत.वेसाव्यातील नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.येथील ९ प्रमुख गल्ल्या वाजत गाजत मानाचा सोन्याचा नारळ घेउन कोळी बँन्ड बाज्यासकट मिरवणुकीत सहभागी होतात.काही जण तर पारंपारीक कोळी पेहरावात सज्ज होउन मिटवणुकीचा आनंद द्विगुणाने वाढवतात.सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करण्याचा मान गल्लीतील अध्यक्षाला असतो.नारळ मिरवणुक बंदरावर पोचली की सर्व जण नारळाची व दर्या सागराची आरती ओवाळतात व शांत होउन मासेमारी व्यवसायाला यश मिळण्यासाठी सागराला साकडे घातले जाते. विशेष म्हणजे वेसावे गावात सागराला शहाळीचा असोल नारळ अर्पण केला जातो. सोन्याच्या नारळा बरोबरच घरोघरचे सदस्य आपल्या कुटुंबाचा नारळ घेउन मिरवणुकीत सहभागी होतो अशी माहिती राजहंस टपके व प्रवीण भावे यांनी दिली.

 येथील नारळी पुनवेचा वेगळेपणा म्हणजे सागर पुजेच्या वेळेस बंदरावर कोळी बँड पथके काही वेळ छान अश्या बहारदार कोळी गीते व इतर गाणी वाजवून वातावरण मंत्र मुग्ध करून टाकतात जणू येथे संगीत मैफीलच भरली आहे असे वाटते. या वर्षी वेसाव्यातील बुधा गल्ली कोळी जमात हि वार्षीक दहि हंडी उत्सवाची मानकरी असल्या कारणाने या नारळी पोर्णिमा उत्सवातील आमच्या गल्लीची मिरवणुक भव्य असणार आहे अशी माहिती या गल्लीचे अध्यक्ष राजहंस लाकडे यांनी दिली. 

 या सणाच्या दिवशी वाळू शिल्प व कलाक्रुतीचा सुंदर नमुना पहायचा असेल तर वेसावे गावातील पाटील गल्ली येथील बंदराला नक्कीच भेट द्यायला हवी कारण या गावातील तरूण कलाकार मंदार पाटील व त्याच्या मित्र संघाने तयार केलेले वाळू शिल्प पाहण्या जोगे असतात. शिवाय त्या शिल्पांना एखादा सामाजीक विषय जोडलेला असतो अशी माहिती येथील मोहित रामले याने दिली. 

वेसावे गावात आणखी एक जुनी परंपरा आहे. नारळी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावातील श्री राम मंदिरात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते ज्यात गावातील विविध गल्लींचा सहभाग असतो. या सप्ताहाची सांगता ही दहीहंडीच्या दिवशी होते.आणि येथील राम मंदिर परिसररात बांधलेली मानाची हंडी अणुकुचीदार भाल्याने फोडण्याचा मान यंदा बुधा गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष राजहंस लाकडे यांना मिळणार आहे. 

   वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची मजाच काही औरच    

आजही २१व्या शतकात वरळी कोळीवाड्यासह मुंबईतील इतर कोळीवाड्यात चालत असलेल्या रूढी-परंपरा टिकून असून कोळी समाजाच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे अनोखे दर्शन यानिमित्य वरळी कोळीवाड्यात घडते.वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगभग एक महिना आधी सुरु होते.येथे हाताने नारळ फोडण्याचा स्पर्धा चांगल्याच रंगतात.सुमारे एक महिनाभर चालत असलेल्या या नारळ फोडण्याच्या स्पर्धेत हजारो नारळ फुटतात.ज्याच्या हातातील नारळ फुटेल त्याच्या प्रतीस्पर्धेला नारळ मिळतो अशी माहिती कै.माणिक धर्मा पाटील जमातीचे अध्यक्ष व मच्छीमार नेते  विजय वरळीकर यांनी  दिली.सर्व राजकीय पक्षांचे नेते व अनेक मान्यवर येथील भव्य नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीला आवर्जून वरळी कोळीवाड्यात येतात अशी माहिती त्यांनी दिली.एकंदरीत वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेची मजाच काही और असते असे त्यांनी अभिमानाने सांगितले.  येथील नारळी पौर्णिमेच्या कै.माणिक धर्मा पाटील जमात ट्रस्टच्या सजवलेल्या होडीवरून आणि कै.हिरा कापर जमातच्या सजवलेल्या पालखीतून  संध्याकाळी भव्य मिरवणुका काढण्यात येतात .कोळी वेषात कमरेला रुमाल बांधलेली पुरुष मंडळी आणि नऊवारी साड्या नेसलेल्या आणि सोन्याचे दागिन्यांनी मढ्लेल्या कोळी भगिनी या मिरवणुकीत कोळी गीतांच्या तालावर ठेका धरत सामील होतात. आलेल्या मान्यवरांना आणि राजकीय पुढारी यांना खास कोळी पेह्ररावाच्या टोप्या भेट दिल्या जातात.संध्याकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेऊन आम्हाला यंदा चांगली मासळी मिळू दे,आमच्या कुटंबाचे वादळ-वाऱ्यापासून रक्षण कर,अतिरेकी हल्यावर लक्ष ठेऊन आमच्या भारमातेचे रक्षण कर असे मनोभावे गाऱ्हाणे सागर देवतेला घातले जाते .मग वरळी कोळीवाड्यातील बतेरी या जागी सुमुद्राला सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करण्याचा मान हा कै.माणिक धर्मा पाटील जमातीचे अध्यक्ष विजय वरळीकर आणि कै.हिरा कापर जमातीचे अध्यक्ष देवेंद्र कासकर यांना मिळाला आहे.

टॅग्स :मुंबईबातम्यासांस्कृतिक