मुंबई : ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फ्रेड होएल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नेहरू तारांगण येथे ज्येष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मांड, आकाशगंगा, तारे यासंदर्भात संशोधन करताना होएल यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले, ही आयुष्यातील मोठी संधी होती, असे नारळीकर यांनी सांगितले. या प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा देत होएल यांच्या संशोधनाचा प्रवास कसा होत गेला हे नारळीकरांनी उलगडून सांगितले.‘होएल यांनी केलेले संशोधन सुरुवातीला नाकारण्यात आले. मात्र खगोलशास्त्रात पुढे त्यांच्याच संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले, तेच जगमान्य झाले. विश्वनिर्मितीच्या विषयावर मी फ्रेड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहिला. महास्फोटातून विश्वनिर्मिती झाली, हा सिद्धांत फ्रेड होएल यांनी कधीच मान्य केला नाही. त्यांनी चेष्टेने त्याला ‘बिग बॅँग’ असे नाव दिले. पुढे हेच नाव प्रचलित झाले,’ असे नारळीकर म्हणाले.प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना ऐकण्यासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी गर्दी केली होती. याचबरोबर नेहरू तारांगणच्या कर्मचाऱ्यांचीही उपस्थितीही लक्षणीय होती. यावेळी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. (प्रतिनिधी)
नारळीकरांनी दिला गुरूच्या आठवणींना उजाळा
By admin | Published: April 10, 2015 4:29 AM