तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, भविष्यकाळात...; भाजपवरील टीकेनंतर नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:21 PM2024-08-02T16:21:19+5:302024-08-02T16:24:15+5:30
स्वत:चे कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.
BJP Narayan Rane ( Marathi News ) : "आपलं मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होतं. आपल्या अडीच वर्षांच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्षे मागे गेला, असं तेव्हा लोक म्हणायचे. अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते. काही झालं तरी आपलं स्वप्न आम्ही पुरे होऊ देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल," अशा शब्दांत भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आक्रमक शब्दांत निशाणा साधला होता. या टीकेवरून उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, "उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणूकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माननीय नरेंद्रजी मोदींबद्दल हे वाक्य उद्गारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडेपणाला चोख उत्तर देऊन भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा राणे यांनी दिला आहे.
फडणवीसांवरील टीकेवरूनही उद्धव ठाकरेंवर पलटवार
"राजकारणातील माणसे षंड आहेत असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो. आपले मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते. काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होऊ देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वत:चे कौतुक करून घेऊन आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. भाजप व आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो," असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 2, 2024
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात नुकताच पार पडला. "आता लढाईला तोंड फुटलं आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश, ममता बॅनर्जी यांची भेट झाली. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. आम्ही असेच आहोत. वाकडे गेलात की तोडू. भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसं आहे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता कीव येते," अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. तसंच ‘कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुख यांनी सांगितले की मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे डाव होते. पण हे सगळे सहन करून मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. मी तडफेने उतरलोय, तेव्हा एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन,’ असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं.