Join us  

Narayan Rane: “तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल”; नारायण राणेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 6:32 PM

Narayan Rane: दादरा नगर हवेलीमध्ये यापूर्वी मोहन डेलकर सातवेळा निवडून आले होते, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मुंबई: चिपी विमानतळावरील मानापमान नाट्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (Shiv Sena) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. दादरा नगर हवेलीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी सूचक विधान केले आहे. तुमचा ‘तो’ खासदार काही काळाने भाजपमध्ये येईल. तेव्हा संजय राऊत यांनी बोंबलत बसू नये, असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला.

दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीत धडका मारायची भाषा करत आहेत. परंतु कलाबेन डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्या अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे उद्या त्या भाजपमध्येही येऊ शकतात. तेव्हा संजय राऊत यांनी बोंबलत बसू नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. 

शिवसेनेचा यात कोणताही वाटा नाही

दादरा नगर हवेलीमध्ये यापूर्वी मोहन डेलकर सातवेळा निवडून आले होते. आता त्यांची पत्नी निवडून आली. यामध्ये शिवसेनेचा कोणताही वाटा नाही. तिथे शिवसेनेचा साधा शाखाप्रमुखही नाही. पण निवडणूक जिंकल्यानंतर श्रेय घेण्यासाठी शिवसेना सर्वात पुढे नाचत आहे. काही काळाने कलाबेन डेलकर भाजपमध्ये येतील तेव्हा शिवसेनेने बोंबलत बसू नये. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोके जागेवर राहणार नाही. संजय राऊत डोक्याविना दिसतील. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच. डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठे यश आले. आम्ही दिल्ली काबीज करणार, अशा गोष्टी संजय राऊतांनी लिहिल्या. रात्री जे करायचे ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटते, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली. 

दरम्यान, नारायण राणे यांनी या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. 

टॅग्स :राजकारणनारायण राणेसंजय राऊतशिवसेना