मुंबई:चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. या मंचावर काय राजकीय नाट्य रंगते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी केली होती. मात्र, आता चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. तसेच कार्यक्रमाला गालबोट लागेल, असे काही कृत्य आमच्याकडून होणार नाही, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. (narayan rane on chipi airport inauguration)
कोकणवासीयांसाठी मोठा दिवस असून, सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे दोघेही या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यांसह केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोणतेही राजकारण करणार नसल्याचे नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
उद्घाटनाला कोणतेही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू
आम्ही कोणतेही राजकारण करणार नाही. राजकारण केले जाणार नाही. उद्घाटनाला कोणतेही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील, ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला, असे नारायण राणे म्हणाले. पुन्हा हा योग येईल का? असा सवाल केला असता ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असे सांगून राणेंनी अधिक बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, निमंत्रण पत्रिकेत राणेंचे नाव बारीक अक्षरात लिहिण्यात आले आहे. त्यावरुन शिवसेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यावरही प्रतिक्रिया नोंदवत, माझ्याकडे सुक्ष्मच नाही तर लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद आहे. ८० टक्के उद्योग माझ्या हातात आहे. हे काही लोकांना कळत नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.