Join us

मिलिंद नार्वेकर तर 'मातोश्री'वरील 'बॉय', नारायण राणेंनी सांगितला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 6:19 PM

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई-

शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी पुराव्यांशिवाय आरोप करू नयेत. त्यांचीही कुंडली माझ्याकडे आहे. मला बोलायला लावू नका, असा इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यासारखे महत्वाचे नेते उपस्थित नव्हते असं राणे यांना विचारण्यात आलं असता त्यांना नार्वेकरांवर खोचक शब्दात टीका केली. 

"कोण मिलिंद नार्वेकर? मातोश्रीवर बॉयचं काम करायचा तोच ना? अहो माझ्यासमोरची गोष्ट आहे. बेल मारली की यस सर काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे", अशा शब्दात राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांना टोला लगावला. तसंच अनिल परब यांना प्रख्यात वकील असं म्हणत राणेंनी टीका केली. "हल्ली अॅडव्होकेट जनरलला मार्गदर्शन करतात. कुणाला कुठे अटक करायची याबाबत त्यांचेच फोन जातात. आता ते आत गेल्यावर त्यांना किती फोन जातात हा प्रश्न आहे?", असा खोचक सवाल उपस्थित करत राणेंनी अनिल परब यांच्यावर टीका केली. 

संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे'लोकप्रभा'मध्ये असताना राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता तेच राऊत माझ्यामागे माननीय बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा आर्शीवाद आहे असं म्हणत आहेत. मात्र संजय राऊतांनी हे विसरू नये की त्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी ती केव्हाही बाहेर काढू शकतो, असा इशारा यावेळी नारायण राणे यांनी राऊतांना दिला आहे.

"संजय राऊत हे काही शिवसेनेचे नाहीत. ते शिवसेनेची स्थापना झाल्याच्या २६ वर्षांनंतर आले होते. तेही ते काही शिवसैनिक नव्हते. ते सामनाचे संपादक म्हणून आले. त्यांनी लोकप्रभामध्ये असताना बाळासाहेबांना देखील सोडलं नाही. त्यांच्यावर टीका केली होती आणि आता म्हणत आहेत की माझ्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. पण माझ्याकडे संजय राऊत यांची कुंडलीच आहे. ती मी कधीही बाहेर काढू शकतो हे राऊतांनी लक्षात ठेवावं. राऊत हे काहीही पुरावा नसताना आरोप करत आहेत. ते पत्रकार किंवा संपादक नाहीतच. कारण त्यांची भाषा देखील त्या पातळीची नाही", असा हल्लाबोल राणे यांनी केला. 

 

टॅग्स :नारायण राणे मिलिंद नार्वेकरसंजय राऊत