मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. यात आता नारायण राणे यांची भर पडली आहे. नारायण राणे यांनी आज वांद्रे येथील एमईटी संस्थेत छगन भुजबळ यांची भेट घेतली. राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणे पहिल्यांदाच भेटले आहेत. छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी सोडता सर्व राजकीय नेते त्यांची भेट घेताना दिसत आहेत.
भुजबळ-राणे यांच्या भेटीमुळं राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गिरीश महाजन, शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेतली तसंच लालूप्रसाद यादवांनीही त्यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती.