Narayan Rane: मुंबईचा 'दादा' शिवसेना पण ती फक्त; नारायण राणेंचा राऊतांवर जोरदार पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 09:05 AM2022-02-10T09:05:52+5:302022-02-10T09:08:56+5:30
राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत.
मुंबई - शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या चौकशांवरुन केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. ही मुंबई आहे. या मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची दादागिरी पाहाच, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं. तसेच देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतोय. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे ते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी संजय राऊतांच्या या विधानावर प्रहार केलाय.
राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. सरकार पाडण्यासाठी माझ्यासह शरद पवारांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. मात्र या सर्वांची मी पोलखोल करणार असल्याचं ते म्हणाले. तर, ही मुंबई आहे. या मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची दादागिरी पाहाच. आम्हाला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. त्यावर, नारायण राणेंनी भाष्य केलं आहे.
तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 9, 2022
नारायण राणेंनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “शिवसेना” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत. तुमची जागा बाहेर नाही आता “आत”. तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा, कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही, असा शब्दात राणेंनी संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे.
तो ट्रेलर नाही, ट्रेलर यायचा आहे
संजय राऊत यांनी आज राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि शरद पवार यांना एक पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमधून संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपावर गंभीर आरोप केले. केंद्रातलं सरकार आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर करतंय. त्याची माहिती राज्यसभेच्या सभापतींना माहिती द्यावी म्हणून मी हे पत्र लिहिलं आहे. ईडी आणि इतर राष्ट्रीय तपाय यंत्रणा ह्या भाजपाच्या आणि त्यांच्या इतर मालकांच्या क्रिमिनल सिंडिटेच्या भाग बनल्या आहेत. आजचं पत्र हे केवळ माहितीसाठी आहे. तो ट्रेलर नाही. ट्रेलर अजून यायच्या आहेत. या यंत्रणा ब्लॅकमेल करतात. यांचे एजंट आहेत. याचे पुरावे मी देणार आहे.