Narayan Rane : आता गप्प बसणार नाही, नारायण राणेंनी 'त्या' मंत्र्यांना दिला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:06 PM2021-08-25T17:06:31+5:302021-08-25T17:08:20+5:30
नारायण राणेंनी सुरुवातीलाच भाजप नेते आणि समर्थकांचे आभार मानले. भाजपा खंबीरपणे माझ्या पाठिशी उभी राहिली, असेही राणेंनी म्हटले. त्यानंतर, राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानांची उजळणी केली होती.
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय वाद रस्त्यावर पाहायला मिळाला. त्यानंतर, राणेंना अटक होऊन जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र, इतर गुन्ह्यांसंदर्भात नारायण राणेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली. त्यानुसार, १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
नारायण राणेंनी सुरुवातीलाच भाजप नेते आणि समर्थकांचे आभार मानले. भाजपा खंबीरपणे माझ्या पाठिशी उभी राहिली, असेही राणेंनी म्हटले. त्यानंतर, राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानांची उजळणी केली होती. त्यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांचे वाचन करुन दाखवले. त्यामध्ये, अमित शहांना निर्लज्जपणाने हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो. त्यानंतर, रिएक्शन आली, शिवसेनेचे लोकं रस्त्यावर उभारले, एका ठिकाणी 17 जण होते, मी आवर्जून मोजले, असेही राणेंनी सांगितलं.
कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार !!
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 25, 2021
धन्यवाद! @BJP4Maharashtra@BJP4India#JanAshirwadYatra
मी तुम्हाला घाबरत नाही, तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलोय. शिवसेना वाढविण्यात माझाही मोठा सहभाग आहे. तेव्हा, आत्ताचे कोणीही नव्हते, अपशब्द बोलणारेही नव्हते. म्हणून, त्यांना जे करायचंय ते करू देत. आपण सर्वांनी अनिल परब यांची रेकॉर्डींग पाहिली असेल. त्यात, ते पोलिसांना आदेश देत आहेत, असे म्हणत राणेंनी शिवसेना आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांची पत्रकार परिषद. https://t.co/HJb0J8Uc2C
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 25, 2021
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्यच उरलं नाही. महिलांवर अत्याचार होत आहेत, व्यापाऱ्यांची दुकानं लुटली जात आहेत. बलात्कार करुन हत्या केल्या जात आहेत. दिशा सालियनचं कोणी केलं, कोण मंत्री आहेत? का त्याचा छडा लागत नाही. पूजा चव्हाण बाबतीत तेच घडलं. आत्ता गप्प बसणार नाही, काहीही होऊ दे... त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आम्ही पाठलाग करणार, असे म्हणत नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत शिवसेनेला थेट इशाराच दिला. तसेच, आम्ही लोकशाही मार्गाने, कायद्याने, न्यायालयात जाणार... बघुया कोण वाचवतं, असे राणेंनी म्हटलं. याप्रकरणात असलेल्यांना अटक होईपर्यंत गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.