मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय वाद रस्त्यावर पाहायला मिळाला. त्यानंतर, राणेंना अटक होऊन जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र, इतर गुन्ह्यांसंदर्भात नारायण राणेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली. त्यानुसार, १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. त्यामध्ये, नारायण राणेंनी शरद पवार यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
भाजपा खंबीरपणे माझ्या पाठिशी उभी राहिली, असे म्हणत राणेंनी सुरुवातीलाच भाजपा व समर्थकांचे आभार मानले. त्यानंतर, राणेंनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंच्या विधानांची उजळणीच केली. ''हे महाशय काय बोलले, सेना भवनबद्दल कोण अशी भाषा करेल तर त्याचे थोबाड फोडा, हा गुन्हा नाही का?, 120 ब होत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचे वाचनच करुन दाखवले. त्यामध्ये, अमित शहांना निर्लज्जपणाने हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. तर, योगी आदित्यनाथ यांना ढोंगी म्हणत चप्पलेने मारावे, असे शब्द उद्धव यांनी वापरले होते. पवारसाहेब ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा हा सुसंस्कृतपणा बघा, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
माननीय पवारसाहेब, काय सज्जनपणाय, साळसपणाय. एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केलं तर चुकीचं केलं, असं मला नाही वाटतं, असे म्हणत शरद पवार यांच्यावरही टिपण्णी केली. आम्ही तर राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून बोललो, असे स्पष्टीकरणही राणेंनी दिलं.
जनआशीर्वाद यात्रा यापुढेही सुरूच राहील
गेल्या काही दिवसांपासून माझी जनआशीर्वाद यात्रा सुरु होती. काहीजण माझ्या मैत्रीचा फायदा उचलतात हेदेखील माझ्या लक्षात आलं आहे. ही जनआशीर्वाद यात्रा पंतप्रधानांना ७ वर्ष झाली. या कालावधीत केंद्राने आणलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणं यासाठी ही यात्रा काढली होती. देशाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. सर्व नवनियुक्त मंत्र्यांना राज्यात जाऊन जनतेची आशीर्वाद मागून खात्यातील कामकाजाला सुरुवात करा अशी सूचना पंतप्रधानांनी दिली होती. १९ ऑगस्टपासून माझ्या जनआशीर्वादाला यात्रेला सुरुवात झाली. दोन दिवस खंड पडला आहे. पुन्हा जनआशीर्वाद यात्रा पुढे सुरुच राहील असं राणेंनी सांगितले.
राणेंबद्दल शरद पवार काय म्हणाले
शरद पवार मंगळवारी त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांनी निवासस्थानाबाहेर निघताना कारमधूनच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्याचं पवारांना विचारण्यात आलं. त्यावर पवारांनी 'मी राणेंना महत्त्व देत नाही. त्यावर काय बोलायचं?' इतकंच भाष्य करत संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आणि ते नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.