Join us

...तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप; कुंडली मांडण्याची धमकीच दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 5:53 PM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर आता भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया आणि प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांवर आता भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया आणि प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे. राऊतांनी काल देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्यांसह भाजपा नेत्यांना लक्ष केल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. 'लोकप्रभा'मध्ये असताना राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता तेच राऊत माझ्यामागे माननीय बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा आर्शीवाद आहे असं म्हणत आहेत. मात्र संजय राऊतांनी हे विसरू नये की त्यांची कुंडली माझ्याकडे आहे. मी ती केव्हाही बाहेर काढू शकतो, असा इशारा यावेळी नारायण राणे यांनी राऊतांना दिला आहे.

"संजय राऊत हे काही शिवसेनेचे नाहीत. ते शिवसेनेची स्थापना झाल्याच्या २६ वर्षांनंतर आले होते. तेही ते काही शिवसैनिक नव्हते. ते सामनाचे संपादक म्हणून आले. त्यांनी लोकप्रभामध्ये असताना बाळासाहेबांना देखील सोडलं नाही. त्यांच्यावर टीका केली होती आणि आता म्हणत आहेत की माझ्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. पण माझ्याकडे संजय राऊत यांची कुंडलीच आहे. ती मी कधीही बाहेर काढू शकतो हे राऊतांनी लक्षात ठेवावं. राऊत हे काहीही पुरावा नसताना आरोप करत आहेत. ते पत्रकार किंवा संपादक नाहीतच. कारण त्यांची भाषा देखील त्या पातळीची नाही", असा हल्लाबोल राणे यांनी केला. 

शिवसेना नसती तर राऊत नसते"संजय राऊत अर्धे नव्हे, तर पूर्णपणे राष्ट्रवादीचे आहेत. शिवसेना वाढविण्यात राऊतांनी काहीच योगदान दिलेलं नाही. शिवसेना नसती तर संजय राऊत इथवर पोहोचूच शकले नसते. त्यांनी बाळासाहेबांबद्दल किती वाईट बोललेलं आहे ते मला माहित आहे. मी ते कधीच ऐकून घेतलेलं नाही. माझ्यासमोर बोलला असता तर तिथंच दाखवून दिलं असतं. संजय राऊत हे पगारी नेते आहेत. ओव्हरटाइम करू कमावतो. प्रवीण राऊतच्या चौकशीनंतर आपण पण अडचणीत येणार आहोत याच्या भीतीनं नुसता थयथयाट सुरू आहे. संजय राऊतंची संपूर्ण कुंडलीच माझ्याकडे आहे. त्यांनी मला तोंड उघडायला लावू नये", असं नारायण राणे म्हणाले. 

टॅग्स :नारायण राणे संजय राऊत