मुंबई - संजय राऊत यांना काल घाम फुटला. प्रवीण राऊतने ईडीला जी मुलाखत दिली, त्यानंतर याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्याला आता अटक होणार हे समजले आहे. अनिल परब यांनाही अटक होणार आहे. आज सेना भवन आठवले का, असा सवाल करत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जबरी प्रहार केला. तर, पंत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांना जो बायडनचाही फोन आलता, अशी मिश्कील टिपण्णी राऊत यांनी केली.
राऊत यांनी कधी कोणाच्या कानाखाली वाजविल्याची बातमी ऐकली आहे का, रग लागते त्यासाठी. याच्यात रक्तच नाही. आम्ही मंत्री आहोत, ईडी सीबीआयकडे जाऊन बसलो तर राऊत यांची पळता भुई थोडी होईल असा इशारा राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आदित्य ठाकरेंचा फोन झाला, शरद पवार यांचा फोन आला... असे म्हणत महाविकास आघाडीतील नेत्यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले. याबाबत, पत्रकारांनी प्रश्न विचारताच राणेंनी मिश्कील टोला लगावला.
राऊत यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचा कुठलाही बडा नेता नव्हता. आदित्य ठाकरे का दिसले नाहीत. बोलायला काय जातंय, म्हणायला काय जातंय. मी म्हणतो त्यांना अमेरिकेतून जो बायडनचा फोन आलता, असे राणे यांनी म्हटले. राणेंच्या या विधानावर पत्रकारांसह सर्वांमध्येच हशा पिकला.
संजय राऊतांना शिवसेना संपवण्यास सांगितलंय
राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले, असा सवालही त्यांनी केला. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही टोला लगावला. यावेळी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना राऊत यांच्याबद्दल काय वाटायचे याबाबतची कात्रणेही राणे यांनी वाचून दाखविली. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे वेळ आल्यावर बाहेर काढणार. राऊत हे शिवसेनेचे नाहीत, पूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना शिवसेना संपविण्यास सांगितले आहे. ठाकरेंना हटव शिवसेनेची खूर्ची तुला देतो असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी केला.
तेव्हा साक्षीदार समोर आणेन
सत्तास्थापनेच्या त्या रात्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेव्हा सिल्व्हर ओकवर शरद पवारांना भेटण्यास गेले तेव्हा राऊत हे एकटेच तिथे होते, असा आरोपही राणे यांनी केले. साहेबांचे आणि उद्धवचे मी कपडे उतरवीन, मला पद दिले नाही तर पाहून घेईन असे हे संजय राऊत एकदा बोलले होते. याचा साक्षीदार माझ्याकडे आहे. त्याला हवा तेव्हा समोर आणतो. माझ्यासमोर साहेबांबद्दल बोलला असता तर तिथेच आडवा केला असता. आता पदे मिळालीत म्हणून हे पैसे कमवायला आलेत. संजय राऊत हे पगारी नेता आहेत, सामनामध्ये काम करतात, अशी टीकाही राणे यांनी केली.