Narayan Rane vs NCP: भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईउच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दणका दिला. राणेंच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याबाबत याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. नारायण राणेंचा अधीश (Adhish) बंगल्यातील काही भाग बेकायदेशीर आहे. या बंगल्याचा अनधिकृत भाग नियमित करण्यासाठी राणेंनी दुसऱ्यांदा केलेला अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. तसेच या बंगल्यावर पाडकामाची कारवाई केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने एका आठवड्यात अहवाल सादर करावा, अशी सूचनाही हायकोर्टाने केली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने नारायण राणेंना टोला लगावत एक ट्वीट केले आहे.
नारायण राणे यांच्या बंगल्याचा काही भाग अनधिकृत आहे असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. हा भाग बेकायदेशीर असल्याने तो नियमित करण्यासाठी नारायण राणे यांनी अर्ज केला होता. त्यातील दुसरा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आज राष्ट्रवादीकडून या निर्णयाबद्दल राणेंवर टीका करण्यात आली. "सत्तेच्या अहंकाराला कायदा आणि न्यायव्यवस्थेपुढे नतमस्तक व्हावे लागते. नारायण राणेंच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग दोन आठवड्यांच्या आत पाडण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. कायदा व न्यायव्यवस्थेपेक्षा मोठे कोणीही नाही, प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे", असे ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राणेंना टोला लगावला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथे असलेल्या अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत समोर आली होती. त्यानंतर या बांधकामाविरोधात पालिकेने कारवाई सुरू केली होती. या कारवाई विरोधात नारायण राणे यांनी कोर्टात धाव घेतली. तिथे याबाबत झालेल्या आजच्या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिला. हा निकाल देताना हायकोर्टाने नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातील बांधकाम अनधिकृत असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच या अनधिकृत बांधकाम प्रकरणी हायकोर्टाने नारायण राणे यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला.