'मलाही मारण्यासाठी सुपाऱ्या दिल्या, तोंड उघडायला लावू नका'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 05:52 PM2022-07-26T17:52:35+5:302022-07-26T17:53:25+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
मुंबई-
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. "उद्धव ठाकरेंना मी खूप जवळून ओळखतो. ३९ वर्ष मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांच्या नावानं भावनिक नाटकं चालू आहेत. उद्धव ठाकरे एक नंबरचे खोटारटे, कपटी आणि दुष्टबुद्धीचे आहेत", अशी जहरी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेच्याबाबतीत निर्माण झालेल्या वादाबाबत बोलत असताना नारायण राणेंनी मोठं विधान केलं.
"उद्धव ठाकरे हे खोटारडे, कपटी आणि दृष्ट बुद्धीचे, मी त्यांना जवळून ओळखतो", नारायण राणेंची सडकून टीका
"एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यांच्या हत्येचा कट होता असं मी वाचलं. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं जी जी माणसं मोठी झाली त्यांना संपवण्याचं कटकारस्थान आजवर कुणी केलं? मी शिवसेना सोडली तेव्हा मलाही मारण्याच्या सुपऱ्या दिल्या होत्या. ज्यांना सुपऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं होतं. पण मी गप्प बसलो. आई-वडिलांच्या आशीर्वादानं मी वाचलो. मला तोंड उघडायला भाग पाडू नका", असं नारायण राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे नाटकी माणूस
"उद्धव ठाकरे एकनंबरचे नाटकी असून चार भिंतीत नाटकं करतात. गेली अडीच वर्ष शिवसैनिक आठवला नाही. जनतेची, हिंदुत्वाची कामं केली नाहीत. स्वत:चं पद एकनाथ शिंदेंना दिल्यामुळे त्यांना पोटशूळ झाला आहे. उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षात कधी शिवसैनिकांशी संवाद साधलाय का? एकातरी शिवसैनिकाला मदत केली का? वारसा काय फक्त रक्ताचा असतो का, वारसा विचारांचा असतो. मुख्यमंत्री असताना घेतलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो नव्हता. आजच्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो वापरला. भावनिक राजकारण करुन लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. बाळासाहेब हयात असताना त्यांना छळण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे", असं नारायण राणे म्हणाले.
संजय राऊतांनीच उद्धव ठाकरेंना खाली उतरवलं
"संजय राऊत आज खूप खुश असतील. कारण त्यांचं मिशन पूर्ण झालं आहे. त्यांनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन खाली उतरवलं आहे. माझ्या गुरुनं पवार साहेबांनी दिलेलं काम मी उत्तमरित्या हाताळलं म्हणून संजय राऊत आज समाधानी असतील", असं नारायण राणे म्हणाले.