'मातोश्री'वरील चौघांसाठी 'ईडी'ची नोटीस तयार, नारायण राणेंचा खळबळजनक दावा!, 'ते' चार जण कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 06:03 PM2022-02-18T18:03:51+5:302022-02-18T18:04:31+5:30
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून भाजपाचे किरीट सोमय्या, नारायण राणे तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत गौप्यस्फोट करत आहेत.
मुंबई-
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून भाजपाचे किरीट सोमय्या, नारायण राणे तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत गौप्यस्फोट करत आहेत. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांच्या दाव्यांचा समाचार घेत राऊतांची कुंडली आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर प्रतिहल्ला करत राणे आणि सोमय्या यांचं साटंलोटं असल्याचं म्हटलं होतं. आता नारायण राणे यांनी विनायक राऊत यांना प्रत्युत्तर देताना एक खळबळजनक खुलासाच केला आहे.
'मातोश्री'वरील चौघांना ईडीकडून नोटीस धाडली जाणार असल्याची बातमी मिळाल्याचं नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. "खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे, हत्या झाली. त्यांचीही चौकशी आता परत केली जाईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळते", असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये नमूद केलेले 'मातोश्री'वरील ते चार जण कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसंच नारायण राणे यांना ही माहिती कुणाच्या हवाल्यानं मिळाली अशीही चर्चा सुरू झाली आहे. "विनायक राऊत हे घडल्यावर आपले 'बॉस' आणि आपण कुठे धावणार?", असा सवाल उपस्थित करत राणेंनी टीका देखील केली आहे.
विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ?
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022
विनायक राऊतांनी केला होता हल्लाबोल
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंच्या टीकांना प्रत्युत्तर दिलं होतं. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेकडून 'लाव रे तो व्हिडिओ'चा आधार घेत थेट किरट सोमय्यांचे व्हिडिओच पत्रकार परिषदेत दाखवले. एकेकाळी किरीट सोमय्यांनी नारायण राणेंच्या नावावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना घाबरुनच नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला.
विनायक राऊत यांनी यावेळी किरीट सोमय्यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. त्यात किरीट सोमय्या यांनी सध्याचे भाजपाचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांच्यावर १०० बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडीची चौकशी मागे लागेल म्हणूनच नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असा खळबळजनक आरोप विनायक राऊत यांनी यावेळी केला आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोटारडा असा उल्लेख नारायण राणे यांनी केल्याचा आणखी एक व्हिडिओ सादर केला. नरेंद्र मोदी हा एनडीएचा खोटारडा उमेदवार असल्याचं नारायण राणे म्हणाले होते असा व्हिडिओ विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दाखवला.