मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिशा सालियानबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने कारवाई करण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली होती. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सुशांत सिंहची माजी व्यवस्थापक दिशा सालियनची हत्या झाली असून, हत्येआधी बलात्कार झाल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. मात्र, हा आरोप पूर्णत: चुकीचा असून, एका महिलेची बदनामी करणारा आहे. त्यामुळे यासंदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली होती.
त्याची दखल घेत अध्यक्षा चाकणकर यांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. स्वत: चाकणकर यांनी ट्वीट करीत याबाबत माहिती दिली आहे.