...तर नारायण राणेंच्या पराभवाची हॅट्ट्रिक होईल
By admin | Published: February 9, 2017 11:44 PM2017-02-09T23:44:03+5:302017-02-09T23:44:03+5:30
विनायक राऊत यांची टीका; सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय २३ फेब्रुवारीनंतर
सावंतवाडी : काँग्रेस नेते नारायण राणे हे लोकसभा निवडणूक लढविणार असतील तर त्यांचे स्वागतच करेन. कारण त्यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक करायला शिवसेनेला आवडेल. राणे यांनी स्वत: चा स्वाभिमान गमविला आहे. त्यामुळे त्यांना कोण गंभीरपणे घेत नाही, अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचा पाठिंबा काढून घ्यायचा की नाही यावर
२३ फेबु्रवारीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख एकनाथ नारोजी, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, प्रकाश परब, संर्पकप्रमुख राजू नाईक, सागर नाणोस्कर आदी उपस्थित होते. यावेळी खासदार राऊत म्हणाले, शिवसेना सत्तेसाठी कधीही लाचार झाली नाही आणि होणार नाही. आमची नाळ ही सामान्य माणसांशी जोडली आहे. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न घेऊनच शिवसेना कायम मैदानात उतरेल. शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी ाँग्रेस भाजपला बाहेरून पाठिंबा देईल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सध्या बेघर आहे. त्यांना कोणाचाच आधार उरला नाही. त्यामुळे ते भाजपशी सलगी करून असल्याची टीकाही राऊत यांनी यावेळी केली.
नारायण राणे हे आगामी काळात लोकसभा निवडणूक लढवत असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांचा इजा बिजा तिजा करायला शिवसेनेला आवडेल.
त्यांच्या पराभवाची नक्कीच हॅट्ट्रिक होईल असे सांगत राणेंकडे आता स्वाभिमानच शिल्लक राहिला नाही आणि ते बोलतात त्यांना कोण गंभीरपणे घेत नाही.
राज्यातील सरकार नोटीस हे कालावधीवर चालले आहे. ही वस्तुस्थिती आहे. पाठिंबा काढून घ्यायचा की नाही यावरचा निर्णय २३ फेब्रुवारीनंतर शिवसेना पक्षप्रमुख घेणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचीच सत्ता येणार. आम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज लागणार नाही आणि घेणारही नाही, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)