Join us

एमआयएमच्या मतांवर नारायण राणेंचा डोळा

By admin | Published: March 23, 2015 2:35 AM

वांद्रे (पू.) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांची उमेदवारी काँग्रेसने रविवारी अधिकृतपणे जाहीर केली असून, राणे येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

वांद्रे पोटनिवडणूक : शिवसेनेची सर्व फौज मैदानातमुंबई : वांद्रे (पू.) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांची उमेदवारी काँग्रेसने रविवारी अधिकृतपणे जाहीर केली असून, राणे येत्या मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही याविषयीचा एमआयएमचा निर्णय सोमवारी होणार आहे. एमआयएमचा उमेदवार रिंगणात असला किंवा नसला तरी एमआयएमच्या मतपेटीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न राणे करणार आहेत. तृप्ती सावंत यांच्या विजयाकरिता आपल्या ६३ आमदार व १८ खासदारांची फौज रिंगणात उतरवण्याचे शिवसेना नेतृत्वाने ठरवले आहे.राणे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात सुमारे ८ हजार मते मिळविणारा राष्ट्रवादीचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता. मात्र या वेळी राष्ट्रवादीने उमेदवार देऊ नये, अशी विनंती राणे यांनी पवार यांना केली व ती त्यांनी मान्य केली. तासगावची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याकरिता वांद्रे (पूर्व)मध्ये उमेदवार द्यायचा नाही हे राष्ट्रवादीने यापूर्वीच जाहीर केले होते.आता काँग्रेसनेही तीच भूमिका घेतली आहे. एमआयएम पोटनिवडणुकीत उमेदवार देणार किंवा कसे याचा निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीमध्ये सोमवारी दुपारपर्यंत होईल, असे पक्षाचे आमदार वारीस पठाण यांनी सांगितले. मात्र मागील निवडणुकीतील उमेदवार रेहबारखान यांनी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. भाजपाच्या उमेदवाराला नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फायदा झाला होता. अन्यथा आतापर्यंत वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघात भाजपाला फारसे अनुकूल वातावरण राहिले नव्हते. राणे यांच्या उमेदवारीनंतर भाजपाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराचे किती मनापासून काम करतात हाही कळीचा मुद्दा आहे. गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना यांचे संबंध ताणले गेले असून ‘मातोश्री’ खालची जागा शिवसेनेने गमावली तर शिवसेनेच्या आक्रमकतेचा ब्रेक लागेल, असे भाजपामधील काहींना वाटते.तेव्हाचे व आताचे गणितगेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बाळा सावंत यांना ४०,८८४ (३३.२३ टक्के), भाजपाचे कृष्णा पारकर यांना २५,४६३ (२०.७१ टक्के) व एमआयएमचे राजा रेहबार सिराज खान यांना १९,८५६ (१९.२७ टक्के) मते मिळाली होती.वांद्रे (पूर्व) मधील बेहरामपाडा व भारतनगर या दोन महापालिका वॉर्डात २०१४ च्या निवडणुकीत एमआयएमचा उमेदवार आघाडीवर होता. याखेरीज गोळीबार व नौपाडा या दोन वॉर्डात एमआयएम महापालिका निवडणुकीत बाजी मारु शकते, असे वातावरण आहे. दीड वर्षांनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक असून वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत एमआयएमने उमेदवार दिला नाही तर त्याचा परिणाम त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होईल, असे बोलले जात आहे. एमआयएमने उमेदवार दिला अथवा दिला नाही तरी एमआयएमकडे झुकलेल्या मुस्लीम समाजाची मते काँग्रेसच्या चिन्हाकडे वळवण्याची किमया राणे करु शकणार का, याबाबत औत्सुक्य आहे. (विशेष प्रतिनिधी) शिवसेनेने आपल्या बळावर ही पोटनिवडणूक लढवण्याचे ठरवले असून, आपले ६३ आमदार व १८ खासदार यांना प्रचाराकरिता रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. त्याचेच दर्शन पुन्हा घडणार आहे.