शिवाजी पार्कवरुनच राणेंची जनआशीर्वाद यात्रा, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:42 PM2021-08-17T13:42:08+5:302021-08-17T13:43:36+5:30
भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन ११४’ सोपवल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊनच सुरू होणार आहे.
मुंबई - मुंबई महापालिकांच्या आगामी निवडणुकांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात असले, तरी या माध्यमातून भाजपने महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे केंद्रीयमंत्री नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू होत असून स्वर्गीय शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करुनच सुरुवात होत आहे.
भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन ११४’ सोपवल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊनच सुरू होणार आहे. त्यामुळे, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न राणेंकडून होत असल्याचे दिसून येते. शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर जाऊन राणेंकडून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येईल. नारायण राणे पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जात आहेत. त्यामुळे, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार, १९ ऑगस्टपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यात असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि भगवान कराड यांनी आपापल्या जनआशीर्वाद यात्रांना सुरुवात केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबई आणि कोकण पट्ट्यातही असणार आहे. पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा
19 ऑगस्ट - मुंबई शहर
20 ऑगस्ट - मुंबई उपनगर
21 ऑगस्ट - वसई विरार
23 ऑगस्ट - महाड
24 ऑगस्ट - चिपळूण
25 ऑगस्ट - रत्नागिरी
26 ऑगस्ट - सिंधुदुर्ग
केंद्रीय मंत्री नारायण राणे ७ दिवस चालणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेत एकूण १७० हून अधिक भागांना भेट देणार आहेत. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत. या यात्रेत भाजपसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्तेही भाग घेणार आहेत. यापूर्वी, भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे सुरू झाली असून, केंद्रीय मंत्री म्हणून स्थानिक आरोग्य सुविधांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे पाहणे आपली जबाबदारी असल्याचे भारती पवार यांनी सांगितले.
नारायण राणेंवर ‘मिशन ११४’ ची जबाबदारी?
दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे मिशन देण्यात आले असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे भाजपने ठरवल्याचे सांगितले जात आहे. महापालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या एन्ट्रीने ही निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत संघर्षाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.