भिवंडी - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपा खासदार कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनासाठी भिवंडीत आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंनी राज्यात सरकार स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. राज्यात महाविकास आघाडीने स्थापन केलेले सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते, असे आम्हाला वाटते. कदाचित येत्या ११ दिवसांत राज्यातील सरकार कोसळेल. हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तसे शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवू शकत नाही.''
''शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळी केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली आहे. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्ताधारी तयार करत आहेत,'' असा टोला नारायण राणे यांनी लगावला. मात्र भविष्यात उद्धव ठाकरे भाजपासोबत आल्यास त्याला विरोध करणार का? अशी विचारणा केली असता नारायण राणे यांनी जो पक्षाचा निर्णय असेल. तोच आपला निर्णय असेल असे सांगितले.
संबंधित बातम्या
भाजपा राज्यातील सरकार पाडायचे तेव्हा पाडणार, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
'मुक्या मुख्यमंत्र्यां'मुळे महाराष्ट्र अधोगतीकडे; नारायण राणेंचा घणाघात
सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर
मुख्यमंत्रिपदावरून भाजपासोबत वाद झाल्यानंतर शिवसेना महायुतीमधून बाहेर पडली होती. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. तसेच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.