मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे १ आॅक्टोबरला नवीन पक्ष स्थापनेची घोषणा करतील. सध्याच्या स्वाभिमान संघटनेचे पक्षात रूपांतर केले जाईल व तो पक्ष भाजपाला पाठिंबा देईल. त्याबदल्यात राणे यांना मंत्रिपद दिले जाईल, असे निश्चित झाले आहे. आता कृती करणे बाकी आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली.दिल्लीत झालेल्या अमित शहा-राणे भेटीत याला अंतिम स्वरूप दिले, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राणेंसोबत किती लोक येतील, याचा अंदाज घेतला गेला आहे. येणाºयांचे पुनर्वसन कसे करायचे, यासाठी चर्चेच्या दोन फेºया राणे यांच्या कार्यालयात झाल्या. त्या वेळी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हजर होते, असे कळते.भाजपाचे पहिले लक्ष्य शिवसेना असेल. सेनेतील काही नाराज नेते थेट भाजपात जाऊ इच्छित नाहीत. त्यांना राणे यांच्या पक्षात प्रवेश दिला जाईल. त्याशिवाय मतदारसंघनिहाय स्थानिक गणिते, मतदारसंघातील भाजपाचे स्थान लक्षात घेऊन कोणाला थेट भाजपात आणि कोणाला राणे यांच्यामार्फत प्रवेश द्यायचे, याचे नियोजन सुरू असल्याचेही तो नेता म्हणाला. राणे यांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे काही आमदार राणे यांच्या संपर्कात असले तरी ते पक्ष सोडण्याची शक्यता तूर्त नाही, राणे यांनी त्यांचा मुलगा नितेश यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मग आम्ही पक्ष का सोडावा, असा सूर काही काँग्रेस आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ सप्टेंबरला परदेशातून येतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख ३० तारखेच्या दसरा मेळाव्यात भूमिका जाहीर करतील. त्यानंतर या घडामोडी होतील.नाव ‘स्वााभिमान’ का?नव्या पक्षाला स्वाभिमान नाव द्यायचे का? यावरही चर्चा झाली. या संघटनेचे मुंबई, कोकणात व अन्यत्र असणारे कार्यकर्ते व वेळोवेळी त्यांनी घेतलेली भूमिका यामुळे राणे अडचणीत आले होते. मात्र संघटनेचे नाव सर्वांना माहीत आहे, शिवाय त्यातून कोणतीही पक्षीय भूमिका लगेच स्पष्ट होत नसल्याने हेच नाव घेण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले.
नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ पक्ष? भाजपाला पाठिंबा देणार, राजकीय अडचण असणा-यांची सोय
By अतुल कुलकर्णी | Published: September 29, 2017 5:15 AM