नरेंद्र मेहतांकडे मिळाली ३ कोटींची लेम्बोरगिनी; एसीबीकडून १५ तास झडती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 06:53 AM2022-05-22T06:53:44+5:302022-05-22T06:54:26+5:30
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेल्या मेहता यांनी १ जानेवारी २००६ ते १ ऑगस्ट२०१५ या कालावधीमध्ये पदाचा गैरवापर केला.
जमीर काझी
मुंबई : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडील झडतीत कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्याकडे तीन कोटींची लेम्बोरगिनी कारसह ३ अलिशान गाड्या,दीड कोटींचे सोने व हिऱ्याचे दागिने मिळाले आहेत. त्याशिवाय कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे बाँड व बँक खाती असल्याचे आढळले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुमारे १५ तास त्यांच्या निवासस्थान व कार्यालयाची झडती घेतली. त्यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात येईल, असे विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेल्या मेहता यांनी १ जानेवारी २००६ ते १ ऑगस्ट२०१५ या कालावधीमध्ये पदाचा गैरवापर केला. ज्ञात स्त्रोत उत्पन्नापेक्षा ८ कोटी २५ लाख ५१ हजार ७७३ रुपये एवढी अधिक मालमत्ता असल्याचे आढळले. त्यानुसार गुरुवारी एसीबीने नवघर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर व पत्नी सुमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. झडतीत ३ कोटीची लेम्बोगिनी व एक कोटी किमतीची इनोव्हा कार मिळाली आहे.