मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसच्या गुलाम नबी आझाद यांच्यासह ४ खासदारांचा २ फेब्रुवारी रोजी संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना नरेंद्र मोदींनीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले. त्याचसोबत गुलाम नबी आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरून नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. यावरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. याचदरम्यान आता काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
नाना पटोले एका मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगं ठरणार नाही. त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं. राज्यसभेत नरेंद्र मोदींची नौटंकी आपण पाहिली, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. जे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते, असा टोला देखील नाना पटोले यांनी लगावला आहे.
तत्पूर्वी, गुजरातच्या पर्यटकांवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा सर्वात आधी गुलाम नबी आझाद यांचा फोन मला आला, तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची जशी चिंता असले तशी चिंता गुजरातच्या लोकांबद्दल आझाद यांना होती, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तसेच या हल्ल्यात ८ लोक मारले गेले होते, तेव्हा प्रणब मुखर्जी संरक्षण मंत्री होते, मी त्यांना या पर्यटकांचे मृतदेह गुजरातमध्ये आणण्यासाठी संरक्षण खात्याच्या एअरप्लेनची मागणी केली, प्रणब मुखर्जी यांनी सांगितले चिंता करू नका, रात्री खूप उशीर झाला होता, पुन्हा गुलाम नबी आझाद यांचा मला फोन आला. ते एअरपोर्टवर होते, आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांची त्या सदस्यांची काळजी घेतली...अशी चिंता....म्हणत ते वाक्य नरेंद्र मोदी पूर्ण करू शकले नाहीत, त्यांना गहिवरून आल्याचे दिसून आले होते.
रडण्यात नरेंद्र मोदींचा विक्रम- संजय राऊत
संसदेत मंगळवारी झालेल्या प्रकारावर इतकेही भावनिक होण्याची गरज नव्हती. अशाप्रकारे अश्रूंचा बांध फुटणे हे काही नवीन नव्हते. देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे संसदेत रडतात, हा एक प्रकारचा विक्रम आहे. कारण आतापर्यंत ५ ते ७ वेळा नरेंद्र मोदी भावनिक झाले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितले. यासोबतच दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करतायत, अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले, तेव्हा नरेंद्र मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
...तर आम्हाला आनंद होईल- अजित पवार
पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल," अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला.