Join us

फडणवीसांच्या ड्रायव्हिंगबाबत मोदींनीही मला विचारलं, म्हणाले...; एकनाथ शिंदेंनी सांगितला दिल्ली भेटीचा किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 10:56 AM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी घेतली.

मुंबई-

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं लोकार्पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची चाचणी घेतली. समृद्धी महामार्गावरील टेस्ट ड्राइव्ह कशी होती याचा अनुभव शेअर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या टेस्ट ड्राइव्हची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतल्याचं सांगितलं. फडणवीस-शिंदेंनी टेस्ट ड्राइव्ह केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. मोदींनी यावेळी आपल्याला समृद्धी महामार्गावरील टेस्ट ड्राइव्हचा अनुभव विचारल्याचं शिंदेंनी सांगितलं. 

एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीतील किस्सा सांगितला. समृद्धी महार्गावरील टेस्ट ड्राइव्हवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती स्टेअरिंग होतं. मग फडणवीसांसोबतच्या ड्राइव्हचा अनुभव कसा होता? याबाबत बोलताना एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचं कौतुक केलं. तसंच सुरुवातीला थोडी भीती वाटली होती. पण ते पट्टीचे ड्र्रायव्हर निघाले असं सांगितलं. 

"समृद्धी महामार्गावर याआधी मी ड्रायव्हिंग केलं आहे. त्यामुळे त्या दिवशी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगचा मूड होता. तेच म्हणाले मी चालवतो तुम्ही बाजूला बसा. आता ड्रायव्हिंग न येणारा बाजूला बसला असेल तर त्याला भीती अजिबात नसते. पण मला ड्रायव्हिंग येत असल्यामुळे थोडी भीती वाटली होती. कारण धाकधूक मनात असते. पण फडणवीसांनी कमाल ड्रायव्हिंग केलं. ते तर पट्टीचे ड्रायव्हर निघाले", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मोदींनीही विचारलं...कैसा रहा सफर"पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी आता जेव्हा दिल्लीत भेटलो तेव्हा त्यांनीही समृद्धीवरील टेस्ट ड्राइव्हबाबत विचारलं. 'कैसा रहा सफर, किधर है आपके साथी' असं मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जुन विचारलं", असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच समृद्धी महामार्गासाठी पंतप्रधान मोदीही उत्सुक असल्याचं म्हणाले. 

दोन्ही हातांनी देणारा महामार्गसमृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला दोन्ही हातांनी भरभरुन देणारा मार्ग ठरणार असल्याचा विश्वास यावेळी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. "समृद्धी महामार्ग केवळ रस्ता नसून यामाध्यमातून अनेकांना रोजगार निर्माण होणार आहे. रस्त्याच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क, गोडाऊन उभारले जात आहेत. शेततळी उभारली आहेत. त्यात काठोकाठ पाणीही आहे. टेक्सटाइल पार्क उभारलं जाणार आहे. शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यात फार मोठा हातभार लाभणार आहे", असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेनरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीस