Join us

एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा अनुयायी, फडणवीसांच्या वाक्यावर मोदींच्या टाळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 5:36 PM

मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज सायं ५ वाजता नरेंद्र मोदींचे आगमन झाले.

मुंबई - राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात आहे. त्यामध्ये  शिंदे गट व भाजपने आघाडी घेतली आहे. याचीच एक झलक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी हे अखील विश्वाचे लोकप्रिय नेता असून मुंबईकरांचं मोदींवर सर्वाधिक प्रेम असल्याचं ते म्हणाले. यावेळी, देवेंद्र फडणवीसांनीएकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचा सच्चा पाईक असल्याचं म्हटलं. त्यावेळी, मोदींनी टाळ्या वाजवून फडणवीसांच्या भाषणाला दाद दिली. 

मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज सायं ५ वाजता नरेंद्र मोदींचे आगमन झाले. त्यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचा सन्मान केला. त्यानंतर, भाषणाला सुरुवात करताना मोदी आणि एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि जनप्रिय मुख्यमंत्री अशा शब्दात एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला. तसेच, दावोस दौऱ्याहून महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन आले आहेत, असेही म्हटले. यावेळी, मोदींनी टाळ्या वाजवून दाद दिली. तसेच, मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत, जर लोकप्रिय नेत्यांची स्पर्धा घेण्यात आली तर मोदींना सर्वाधिक पसंती ही मुंबईकरांची असेल असं फडणवीस म्हणाले. त्यासोबतच, नाव न घेता शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर टिका केली. अडीच वर्षांपूर्वी आपल्यासोबत विश्वासघात झाला. पण, बाळासाहेबांचा सच्चा पाईक असलेल्या एकनाथ शिंदेंनी हिम्मत दाखवली आणि राज्यात डबल इंजिन सरकार आलं, असे फडणवीसांनी म्हटलं. फडणवीसांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यासोबतच केंद्रीयमंत्री नारायण राणेंनीही टाळ्या वाजवत फडणवीसांच्या भाषणाला दाद दिली. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील 1 लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित होणार आहे. त्यासोबतच, मेट्रो लाईन्सचे लोकार्पण, आपला दवाखान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे नुतनीकरण आणि शुद्ध पाण्यासाठी सयंत्र प्रकल्पाचेही भूमीपूजन मोदींच्या हस्ते होत आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसशिवसेना