मोदींनी पाकिस्तानमधून दाऊदऐवजी साखर आणली- अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 08:00 PM2018-05-14T20:00:53+5:302018-05-14T20:00:53+5:30
भाजप - शिवसेना पाकिस्तानची साखर घरोघरी वाटणार आहेत का?
मुंबई: देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात केली आहे. यामुळे साखरेचे दर कोसळणार असून याचा फटका साखर उद्योगासह ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे आश्वासन देणा-या मोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानची साखर भारतात आणली अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
मुंबईतील गांधीभवन येथे ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगा समोरील अडचणी संदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले की,देशात यावर्षी 250 मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होईल असा सरकारचा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात यावर्षी 320 मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये पडून आहे. यामुळे गेल्यावर्षी 40 - 42 रुपये प्रति किलो असणारे साखरेचे दर आता 25 – 26 प्रति किलो रुपयांवर आले आहेत. दरातील घसरणीमुळे साखर उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. पुढच्या वर्षी सुध्दा मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे त्यामुळे सरकारने पुढच्या तीन वर्षासाठी साखर उद्योगासाठी धोरण तयार करावे ज्यात साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. राज्य सरकारने 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक निर्माण करावा त्याचबरोबर व्याजाची प्रतिपूर्ती, साठवणूक शुल्क, विमा हप्ता आणि रखरखाव खर्च याची तरतूद करावी, इथेनॉलच्या किंमती वाढवाव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.
पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेचे दर देशातील आणि राज्यातील साखरेच्या दरांपेक्षा प्रति किलो एक रुपयाने कमी आहेत. त्यामुळे साखरेचे दर मोठ्या प्रमाणात घसरणार असून याचा मोठा फटका साखर कारखान्यांसोबतच ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. पाकिस्तानला त्यांच्या भाषेतच उत्तर द्या, लव्ह लेटर लिहीणे बंद करा असे म्हणणारे व सरकारच्या विरोधात कोणी काही बोलले की पाकिस्तानात जा म्हणणा-यांना पाकिस्तानचा एवढा पुळका का आलाय? शिवसेनेला पाकिस्तानी कलाकार चालत नाहीत मग साखर कशी चालते? असा सवाल करून पाकिस्तानातून एक रूपये किलो स्वस्त असणारी साखर आयात करून सरकार देशातल्या ऊस उत्पादक शेत-यांवर अन्याय करित आहे. पाकिस्तान प्रेमापोटी देश आणि राज्यातील शेतक-यांवर भाजप सरकारवर अन्याय करित असून सरकारने तात्काळ साखरेच्या आयातीवर बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.
याच पत्रकारपरिषदेत पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका करताना राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता आहे. देशातल्या पाच कोटी ऊस उत्पादक शेतक-यांचे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे प्रलंबीत आहे ते सरकारने त्वरीत द्यावे. 20 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी 55 रूपयांऐवजी 100 रूपये अनुदान द्यावे. 50 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा, इथेनॉलचा दर प्रति लिटर 53 रूपयापर्यंत वाढवावा आणि कारखान्यांकडून सुरु असलेली कर्जाची वसुली त्वरित थांबवावी,कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे व त्याच्या सूचन रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला सरकारने द्याव्यात अशी मागणी केली. सकुमा नावाच्या दिल्लीच्या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात २० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली. देशातील साखरेचे दर पाडण्यासाठीच्या षडयंत्रातून ही आयात केली आहे असा आरोप करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
भाजप - शिवसेना पाकिस्तानची साखर घरोघरी वाटणार आहेत का?- विखे पाटील
केंद्र सरकारने पाकिस्तानमधून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी साखरेवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लावण्याची मागणी समोर आली होती. मुळात आपल्या देशात मागील वर्षातील साखर मोठ्या प्रमाणात शिल्लक होते. त्यात यावर्षी गतवर्षीच्या तुलनेच आणखी दीड पट उत्पादन झाले. त्यामुळे यंदा गळीत हंगामाला सुरूवात झाली तेव्हा साखरेचा सुमारे 3150 रूपयांचा दर घसरून 2550 वर उतरला. बॅंकांनी उचल देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देण्याची अनेक कारखान्यांची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे सरकारने साखरेचा बफर स्टॉक करावा, निर्यातीला अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असताना सरकारच्या नाकाखाली पाकिस्तानची साखर भारतात येते. मात्र हे सरकार झोपा काढते आहे. पाकिस्तानातून साखर आयात करण्याचा निर्णय कोणी घेतला, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची मंडळी कायम पाकिस्तानविरूद्ध मोठा आव आणून बोलत असतात. आता ते पाकिस्तानची साखर घरोघरी वाटणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.