26 एप्रिलला नरेंद्र मोदींचा मुंबईत सभा, उद्धव ठाकरेही राहणार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 08:09 PM2019-04-18T20:09:13+5:302019-04-18T20:10:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची जाहीर सभा होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा "भीमटोला" ठरेल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख भाषणे होणार असून त्याचसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेही सभेला उपस्थित राहणार आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा "भीमटोला" ठरेल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
भाजपा प्रदेश कार्यालयात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. भाजपा उमेदवारांचा मुंबई सुरू असलेला प्रचार याबाबत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. भाजपच्या तीन लोकसभा मतदारसंघात एकूण बावीस पदयात्रा झाल्या, असून प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात वेगवेगळ्या पदयात्रा करत असून आतापर्यंत सुमारे 47 पदयात्रा झाल्या आहेत. आजपर्यंत 140 ठिकाणी कार्यक्रम झाले. तर तीन लोकसभा मतदारसंघात 90 चौक सभा झाल्या. प्रत्यक्ष नागरिकांना भेटीगाठी व त्यांच्या सुमारे 550 ग्रुप मिटींग घेण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सीआरझेड 2 मध्ये शिथिलता आणून मुंबईतील गरीब झोपडपटटीत राहणा-या सुमारे 15 लाख रहिवाशी, गृहनिर्माण सोसायटयांमध्ये राहणा-या मध्यमवर्गीयांच्या 3 लाख 53 हजार घरे व जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीमधील 9 लाख इमारतींच्या पुर्नविकाचे दरवाजे जे खुले केले ते कॉंग्रेस बंद करण्याचे मनसुबे आहेत. त्याची सूतोवाच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात केले आहेत असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात ते जर सत्तेत आले तर या मुंबईकरांच्या स्वप्नाला सुरूंग लावण्याचे सुतोवाच केले आहेत. मालमत्ता करा विषयी अर्धवट माहिती घेऊन बोलणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुंबईकरांच्या या जिव्हाळ्याच्या विषयाला काँग्रेस जे सुरुंग लावू पाहते आहे त्याचे उत्तर आणि द्यावे असा प्रतिहल्ला ही केला.